Friday, October 9, 2026
HomeGadchiroliपेंढरीत पोलिसांच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १७७ नागरिकांची तपासणी...

पेंढरीत पोलिसांच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १७७ नागरिकांची तपासणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली पोलीस दलाचा दुर्गम भागातील नागरिकांसाठी पुढाकार; ३६ जणांना पुढील उपचारांसाठी शिफारस,

गडचिरोली, 09 ओक्टोबर 2026::-गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी पेंढरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने एकूण १७७ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले, तर ३६ जणांना पुढील तपासणी व उपचारांसाठी विविध रुग्णालयांत जाण्याची शिफारस करण्यात आली.

अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमातून नागरिकांना आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि विविध आजारांसह पोषणविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया कुमरे, डॉ. रोशन गिरसावळे, औषधनिर्माण अधिकारी प्रकाश दानव आणि अधिपरिचारिका जयमाला लाटीलवार यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने नागरिकांची तपासणी केली.

आरोग्य सेवेसोबत शहीद जवानांच्या बलिदानाची माहिती :-

शिबिरादरम्यान गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांचे बलिदान, सी-६० पथकाचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती फिरत्या प्रदर्शन व विविध बॅनरच्या माध्यमातून देण्यात आली. यामुळे आरोग्य सेवेसोबतच पोलीस दलाच्या कार्याविषयीही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

आतापर्यंत ५० हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी :-

गडचिरोली पोलीस दलाने २०२१ पासून आतापर्यंत २२२ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. तसेच सहा रक्तदान शिबिरांतून ४,८६४ युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत ९,९७१ हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, १,४१२ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

या आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक सुयश कुमार सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. उपपोलीस स्टेशन पेंढरीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप ताराम व पोलीस अंमलदारांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular