VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
अहेरी नगरपंचायत हद्दीत वांगेपल्ली व चिंचगुडीचा समावेश करण्याची भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी,
गडचिरोली /अहेरी, 01 ऑक्टोबर 2026::-अहेरी शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढता शहरी विस्तार आणि भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेता अहेरीला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अहेरी नगरपंचायत क्षेत्रासोबतच लगतच्या वांगेपल्ली आणि चिंचगुडी ग्रामपंचायत क्षेत्राचे एकत्रीकरण करून ‘अहेरी नगर परिषद’ स्थापन करण्यात यावी, अशी ठोस मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाचे गडचिरोली जिल्ह्याचे विशेष OSD अनिरुद्ध पालकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आले.
अहेरी शहराची लोकसंख्या सध्या ३० हजारांच्या घरात पोहोचली असून, शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, नवीन लेआऊट, वाढती नागरी वस्ती आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. भविष्यातील नागरी सुविधांची गरज लक्षात घेता अधिक सक्षम स्थानिक स्वराज्य संस्थेची आवश्यकता असल्याचे गुडेल्लीवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या नगरपंचायत व्यवस्थेच्या माध्यमातून वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने पाणीपुरवठा, रस्ते, नाल्या, स्वच्छता, पथदिवे, आरोग्य, नियोजनबद्ध नागरी विकास यांसह विविध मूलभूत सुविधांच्या विस्तारासाठी नगरपरिषदेचा दर्जा उपयुक्त ठरेल, असा मुद्दाही निवेदनातून मांडण्यात आला आहे.
अहेरी नगरपंचायत, वांगेपल्ली आणि चिंचगुडी या तीन क्षेत्रांचे एकत्रीकरण करून स्वतंत्र ‘अहेरी नगर परिषद’ स्थापन केल्यास शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास साधता येईल, असे गुडेल्लीवार यांनी स्पष्ट केले. भविष्यात अहेरीच्या प्रशासकीय महत्त्वात होणारी वाढ आणि शहराच्या विस्ताराची शक्यता लक्षात घेता आतापासूनच सक्षम नागरी प्रशासनाची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विशेष OSD अनिरुद्ध पालकर यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत विषय मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास तातडीने आणून देण्याची तसेच शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
“निर्णय होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील”:-
> “अहेरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि आधुनिक नागरी प्रशासनाची गरज आहे. वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता नवीन ‘अहेरी नगर परिषद’ निर्मितीबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा. हा निर्णय होईपर्यंत माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील.”
— अमोल गुडेल्लीवार, भाजपा नगरसेवक, अहेरी
