VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात ठिय्या; रस्त्यांसाठी १५ दिवसांची मुदत, बसफेऱ्यांसाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम,
गडचिरोली /मुलचेरा, ८ सप्टेंबर २०२६ :-मुलचेरा तालुक्यातील रस्ते, वीज, खत, धान बोनस, शासकीय योजनांचे प्रलंबित अनुदान, आरोग्य सेवा आणि एसटी बसफेऱ्यांसह नागरिक व शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मंगळवारी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे गणगर्जन ठिय्या आंदोलन करण्यात आले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विभागीय अध्यक्षा सौ. शाहीनताई हकीम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
मुलचेरा तालुक्यातील गोमणी–मुलचेरा–आष्टी, मुलचेरा–घोट आणि मुलचेरा–बोलेपल्ली–एटापल्ली या प्रमुख मार्गांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यासोबतच शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा, स्मार्ट मीटरची प्रक्रिया बंद करणे, युरिया खताचा मुबलक पुरवठा, निराधार व लाडकी बहीण योजनेचे प्रलंबित अनुदान तातडीने जमा करणे आणि सन २०२५-२६ चा धान बोनस तत्काळ वितरित करणे, अशा मागण्या करण्यात आल्या.
ग्रामीण रुग्णालय, मुलचेरा येथे वैद्यकीय अधीक्षकांची २४ तास उपलब्धता सुनिश्चित करावी, तसेच तालुक्यात बंद किंवा कमी करण्यात आलेल्या एसटी बसफेऱ्या पूर्ववत करून आवश्यक मार्गांवर नवीन बससेवा सुरू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
रस्त्यांसाठी १५ दिवसांची मुदत :-
आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मुलचेरा तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पुढील १५ दिवसांत आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बसफेऱ्यांसाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम :-
एसटी बससेवेच्या प्रश्नावर आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अहेरी आगार व्यवस्थापकांनी दोन दिवसांच्या आत संबंधित मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक बसफेऱ्यांबाबत कार्यवाही करावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने दिलेला शब्द पाळून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची मागणी केली. “जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा आहे. आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, तर पुन्हा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनामुळे मुलचेरा तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. आता दिलेल्या मुदतीत प्रशासनाकडून कोणती ठोस कार्यवाही होते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनात तालुक्यातील नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
