VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी; विजय वडेट्टीवारांकडे निवेदन,
गडचिरोली /मुलचेरा,३० ऑगस्ट २०२६::- शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत मुलचेरा तालुक्यात गंभीर तफावत आढळल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुलचेरा शाखेतील काही शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये प्रत्यक्ष थकीत रक्कम आणि शासनाच्या कर्जमाफी यादीतील रकमेमध्ये फरक असल्याचे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पात्र यादीत काही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष कर्जखात्यातील थकीत मुद्दल व व्याजाच्या तुलनेत कमी रक्कम दाखविण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये मुद्दलापेक्षाही कमी रक्कम कर्जमाफीसाठी समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप असून, अनेक शेतकऱ्यांच्या व्याजाची रक्कम कर्जमाफीमध्ये विचारात घेतली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे शासनाच्या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाही उर्वरित रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत बँक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, संबंधित त्रुटी शासन स्तरावर झाल्याचे सांगून उर्वरित रक्कम भरण्याचा सल्ला देण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ब्रह्मपुरी मतदारसंघाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनाद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र, मुलचेरा शाखेतील संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची सखोल तपासणी करावी, प्रत्यक्ष थकीत मुद्दल व व्याजाची रक्कम आणि शासनाच्या कर्जमाफी यादीतील रकमेची पडताळणी करावी, तसेच पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कर्जमाफीच्या लाभात झालेली तफावत तातडीने दूर करून शेतकऱ्यांवरील अतिरिक्त आर्थिक भार कमी करावा आणि दोषी अथवा संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, पंकज गुड्डेवार, रामभाऊ मेश्राम, रजनीकांत मोटघरे, कुणाल पेंदोरकर, रुपेश टिकले, नंदू वाईलकर, कालिदास कुसनाके (तालुकाध्यक्ष, मुलचेरा आदिवासी काँग्रेस कमिटी), रामू सोमा तोरे धनूर, सुधाकर गुड्डी सेडमाके, तिरमा गुड्डी सेडमाके, शालीक सेडमाके, सरपत नैताम, बिचेंगा सिडाम, महागाव ग्रामपंचायतीचे सदस्य राजू दुर्गे, अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांच्यासह शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
