VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी बंधनकारक; रात्री १० नंतर आवाज केल्यास कारवाईचा इशारा,
गडचिरोली, 10 ऑक्टोबर 2026::-
नवरात्रोत्सव, शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात ११ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत डीजे, वूफर, सब-वूफर आणि अन्य अतितीव्र ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३८ (१) अन्वये यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
लेखी परवानगीशिवाय ध्वनीक्षेपक वापरता येणार नाही :-
आदेशानुसार, सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या परिसरात ध्वनीक्षेपक, लाऊडस्पीकर, ॲम्प्लिफायर आणि इतर ध्वनी उपकरणे वापरण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी मिळाली असली, तरी निर्धारित ध्वनीमर्यादा आणि संबंधित अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. डीजे, प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाइड साउंड इक्विपमेंट, वूफर व सब-वूफर यांसारख्या अतितीव्र आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरास बंदी राहील.
रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनी उपकरणांवर निर्बंध :-
ध्वनिप्रदूषण नियंत्रणाच्या नियमांनुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनी उपकरणांचा वापर करण्यास मनाई राहणार आहे. मात्र, आदेशात नमूद केलेल्या अपवादात्मक दिवस व वेळेसंदर्भातील तरतुदी लागू राहतील.
ध्वनीची निर्धारित मर्यादा औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ व रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबल इतकी आहे.
नागरिकांना त्रास होणार नाही, याची आयोजकांनी घ्यावी काळजी :-
सण-उत्सव साजरे करताना ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि रुग्णांना ध्वनीचा त्रास होणार नाही, याची आयोजकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आणि अधिसूचित शांतता क्षेत्रांच्या परिसरात लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाई :-
ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास पोलीस तत्काळ पाहणी करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३६ तसेच अन्य लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल. वारंवार नियमभंग करणाऱ्यांची परवानगी रद्द करण्यासह कलम ७० अन्वये ध्वनीक्षेपकाचे साहित्य जप्त करण्याची कार्यवाहीही केली जाऊ शकते.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळे, आयोजक आणि नागरिकांनी ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करून सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करावेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या आदेशातून करण्यात आले आहे.
