VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
पावसाळ्यातील दळणवळणाचा प्रश्न सुटणार; नेलगुंडा पोलीस व एसआरपीएफ जवानांच्या पुढाकाराने ग्रामस्थांना मोठा दिलासा,
गडचिरोली, 14 ऑक्टोबर 2026::- गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः नाले आणि ओढ्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो. याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनासह विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यावरही होतो. ही समस्या लक्षात घेऊन नेलगुंडा येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल आणि एसआरपीएफच्या जवानांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून नाल्यावर नवीन पूल उभारला आहे.
१२ ऑक्टोबर रोजी श्रमदानातून उभारणी, :-

नेलगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेलगुंडा गावाजवळील नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीचा मार्ग वारंवार बंद होत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटत होता. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता, तर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देणेही आव्हानात्मक ठरत होते.
या समस्येवर कायमस्वरूपी दिलासा देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ऑक्टोबर २०२६ रोजी अभियानादरम्यान योग्य बंदोबस्त ठेवून नेलगुंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार आणि एसआरपीएफच्या जवानांनी श्रमदान केले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून नाल्यावर नवीन पूल उभारण्यात आला. यामुळे नागरिकांसाठी ये-जा करण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.
सुरक्षेसोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश :-

गडचिरोली पोलीस दलाकडून राबविण्यात आलेल्या या समाजाभिमुख उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुर्गम भागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी पोलीस दलाने पुढाकार घेतल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या मदतीसाठी पुढे येणे आणि विकासात्मक कामांमध्ये योगदान देणे, या भूमिकेचे दर्शन या उपक्रमातून घडले आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठीही अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम :-

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट कुंभार, नेलगुंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य इथापे, एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक मोराणकर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.
दुर्गम भागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी पोलीस दलाने पुढाकार घेतल्याने नेलगुंडा येथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, श्रमदानातून उभारलेला हा पूल पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे प्रतीक ठरत आहे.
