VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
ग्राउंड सर्च आणि रुम सर्चमध्ये दोन कांस्यपदके; घातपातविरोधी तपासणीत गडचिरोली परिक्षेत्राचा राज्यात तिसरा क्रमांक, अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड,
गडचिरोली, 12 ऑक्टोबर 2026::- पुणे येथे आयोजित २१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) उल्लेखनीय कामगिरी करत दोन कांस्यपदकांवर आपले नाव कोरले आहे. घातपातविरोधी तपासणी स्पर्धेतील ग्राउंड सर्च आणि रुम सर्च या दोन्ही प्रकारांत पथकाने कांस्यपदके पटकावली. याशिवाय, घातपातविरोधी तपासणीमध्ये गडचिरोली परिक्षेत्राने राज्यस्तरावर तिसरा क्रमांक मिळविला असून, या पथकाची अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड झाली आहे. या यशामुळे गडचिरोली पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने पोलीस अधिकारी व अंमलदारांचे व्यावसायिक नैपुण्य, गुणवत्ता, कौशल्य, कार्यक्षमता आणि कामाचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दि. ५ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुणे येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस पथकासह एकूण २६ विविध विभागांनी सहभाग नोंदविला.
या मेळाव्यात वैज्ञानिक पद्धतीने गुन्हे तपास, पोलीस छायाचित्रण, व्हिडिओग्राफी, संगणक जागरूकता, घातपातविरोधी तपासणी आणि श्वान पथक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांच्या कौशल्याची पडताळणी करण्यासाठी लेखी, तोंडी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी या स्पर्धांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले.
गडचिरोलीच्या जवानांची कौशल्यपूर्ण कामगिरी :-

घातपातविरोधी तपासणी स्पर्धेत गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस शाखेतील पोहवा/२४८९ पंकज हुलके आणि पोअं/९३९३ धम्मदीप मेश्राम यांनी सहभाग घेतला. दोन्ही जवानांनी उत्कृष्ट कौशल्य आणि व्यावसायिक दक्षतेचे प्रदर्शन करत ग्राउंड सर्च व रुम सर्च या दोन्ही उपप्रकारांत कांस्यपदके मिळविली. त्यांच्या या कामगिरीमुळे गडचिरोली पोलीस दलाची राज्यस्तरावर उल्लेखनीय छाप पडली आहे.
अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात संधी :-

सहा दिवस चाललेल्या या मेळाव्यात घातपातविरोधी तपासणी प्रकारात गडचिरोली परिक्षेत्राने तिसरा क्रमांक पटकावला. या यशाच्या बळावर संबंधित पथकाची अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड झाली आहे. त्यामुळे आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही गडचिरोली पोलीस दलाला आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी पंकज हुलके आणि धम्मदीप मेश्राम यांचे कौतुक केले. भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करून पोलीस दलाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात घातपातविरोधी तपासणी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बीडीडीएस पथकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेली दोन कांस्यपदके आणि अखिल भारतीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही गडचिरोली पोलीस दलाच्या कौशल्याची आणि कार्यक्षमतेची महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.
