Tuesday, October 20, 2026
HomeChamorshiशेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांकडे न जाता चामोर्शी बाजार समितीच्या मार्केटमध्येच आणावे...

शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांकडे न जाता चामोर्शी बाजार समितीच्या मार्केटमध्येच आणावे…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

श्रीराम धानाला ५,००० ते ५,०५० रुपये, तर मोहोर धानाला ४,९०० ते ४,९५२ रुपये प्रतिक्विंटल दर,

चामोर्शी, 20 ऑक्टोबर 2026:’-शेतकऱ्यांच्या कष्टाच्या धानाला योग्य भाव मिळावा, फसवणूक टळावी आणि शेतमालाच्या विक्रीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकऱ्यांनी आपले धान खासगी व्यापाऱ्यांकडे न विकता कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शीच्या मार्केटमध्येच विक्रीसाठी आणावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अतुलभाऊ गण्यारपवार यांनी केले आहे.

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये सध्या श्रीराम धानाला प्रतिक्विंटल ५,००० ते ५,०५० रुपये, तर मोहोर धानाला ४,९०० ते ४,९५२ रुपये दर मिळत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची विक्री अधिकृत बाजार समितीच्या माध्यमातून करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता :-

खासगी दुकानांमध्ये किंवा राईस मिलमध्ये धान विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. धानाच्या वजनात कपात करणे, पोत्यामधून धान खाली सांडवणे, वजन करताना योग्य पद्धतीचा अवलंब न करणे, तसेच विक्री केलेल्या मालाची संपूर्ण रक्कम वेळेवर न देणे, अशा तक्रारी बाजार समितीकडे प्राप्त झाल्या आहेत.

काही ठिकाणी धानाच्या वजनामध्ये तफावत आढळते, तर काही व्यापाऱ्यांकडून मालाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जाते. खासगी व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांकडे विक्रीचा अधिकृत पुरावा नसल्याने त्यांना आपली बाजू मांडताना अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत बाजार समितीमध्ये धान विक्री करून आपल्या मालाचे योग्य वजन, लिलावातील दर आणि व्यवहाराची नोंद याबाबत खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाजार समितीत वजन, लिलाव आणि व्यवहारात पारदर्शकता :-

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये धानाचा लिलाव करून जास्त भाव देणाऱ्या व्यापाऱ्याला माल विक्री करण्याची व्यवस्था आहे. विक्रीच्या प्रक्रियेत वजन आणि काटापट्टी केली जाते. व्यवहारामध्ये अडचण निर्माण झाल्यास बाजार समितीच्या माध्यमातून संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळवून देण्याची तरतूद आहे.

बाजार समितीच्या मार्केटमध्ये हमाल व व्यापारी यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवले जाते. खासगी ठिकाणी धान विक्री करताना वजनामध्ये होणारी संभाव्य कपात आणि इतर अडचणी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती अतुलभाऊ गण्यारपवार यांनी केले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीचा पुढाकार :-

गेल्या १५ वर्षांत शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बाजार समितीकडे सुमारे ६ कोटी रुपये जमा असून, त्यापैकी ३ कोटी रुपये विविध विकासकामांवर खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, शेतमालाच्या खरेदी-विक्रीला चालना देणे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे यावर भर दिला जात आहे.

चामोर्शी बाजार समितीमध्ये धान साठवणुकीसाठी गोदामांची व्यवस्था असून, मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काळात भाजीपाला व फळ मार्केट विकसित करून खरेदी-विक्री सुरू करण्याचाही प्रयत्न असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मार्केटचा लाभ घ्यावा :-

चामोर्शी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या धानाची विक्री करताना कोणत्याही अफवांना किंवा खासगी व्यापाऱ्यांच्या आश्वासनांना बळी न पडता अधिकृत बाजार समितीच्या मार्केटमध्ये धान आणावे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतमालाची विक्री केल्यास व्यवहाराची नोंद राहते आणि तक्रार उद्भवल्यास संबंधित यंत्रणेकडे दाद मागता येते, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे सभापती अतुलभाऊ गण्यारपवार, उपसभापती प्रेमानंद मल्लिक, सचिव निलेश पिंपळकर यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा आणि धान विक्रीच्या व्यवहारात फसवणुकीला आळा बसावा, यासाठी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना अधिकृत मार्केटमध्येच धान विक्री करण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular