VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन; नोंदणीशिवाय सीसीआयकडून कापूस खरेदी नाही,
गडचिरोली /चामोर्शी, 27 ऑक्टोबर 2026::-शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला शासनाने निर्धारित केलेला हमीभाव मिळावा आणि भारतीय कापूस महामंडळामार्फत (CCI) कापूस विक्री करता यावी, यासाठी शेतकऱ्यांनी ‘कापूस किसान ॲप’वर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयमार्फत खरेदी केला जाणार नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शीच्या वतीने करण्यात आले आहे.
शासनाच्या हमीभावानुसार कापूस विक्री करण्यासाठी ‘कापूस किसान ॲप’वर नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम मुदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :-
‘कापूस किसान ॲप’वर नोंदणी करताना शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे व माहिती जवळ ठेवावी.
* शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक
* कापूस पीकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा
* चालू वर्षातील पीकपेरा नोंद (ई-पीक पाहणी)
* आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य)
* शेतकऱ्याचा स्वतःचा फोटो
अडचण आल्यास बाजार समितीशी संपर्क साधा :-
नोंदणी करताना शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शी कार्यालयासह आष्टी, येणापूर, कुनघाडा बाजार समिती आणि मुलचेरा येथील संबंधित कार्यालयांमध्ये भेट द्यावी. तसेच प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर करून घ्याव्यात, असेही सांगण्यात आले आहे.
बाजार समितीचे शेतकऱ्यांना आवाहन :-
कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शीचे सभापती अतुलभाऊ गण्यारपवार, उपसभापती प्रेमानंद मल्लिक आणि सचिव निलेश जे. पिंपळकर यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
कापूस विक्रीच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये आणि शासकीय खरेदी प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ‘कापूस किसान ॲप’वर मुदतीपूर्वी नोंदणी करणे महत्त्वाचे आहे.
