VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
विद्यापीठातील अनावश्यक खर्चाला कात्री लावून निधी विद्यार्थ्यांच्या हितासाठी वापरण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा,
गडचिरोली, 30 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता असून, आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत येऊ नये, यासाठी गोंडवाना विद्यापीठाने दुष्काळग्रस्त, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तातडीने माफ करावे, अशी ठाम मागणी आजाद समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन सादर केले.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. शासनाने जिल्ह्यातील केवळ दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती अनेक ग्रामीण भागांत गंभीर आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण होत आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शैक्षणिक शुल्क भरणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे. शुल्क भरण्याच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबण्याची वेळ येऊ नये, यासाठी विद्यापीठाने संवेदनशील भूमिका घेऊन तातडीने शुल्कमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, प्रसिद्धी, सजावट तसेच पाहुणचारावर होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा घालण्याची मागणीही पक्षाने केली आहे. अशा खर्चात काटकसर करून उपलब्ध निधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कमाफी, शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थी कल्याण योजनांसाठी वळवावा. गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी विशेष तरतूद करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण महत्त्वाचे की विद्यापीठातील समारंभांवरील खर्च? असा सवाल उपस्थित करत, संकटकाळात विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे आजाद समाज पक्षाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून कुलगुरूंनी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आजाद समाज पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी पक्षाचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, तालुका सचिव सुरेंद्र वासनिक, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार उपस्थित होते. पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख प्रतीक डांगे यांच्या पुढाकारातून हे निवेदन सादर करण्यात आले.
