VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
स्वखर्चातून उभारणार भव्य मंदिर; भूमिपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न,
गडचिरोली /अहेरी,29 ऑक्टोबर 2026::-अहेरी तालुक्यातील मरपल्ली व भस्वापूर येथील ग्रामस्थांच्या श्रद्धेला मान देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वखर्चातून हनुमान मंदिर उभारण्याचा पुढाकार घेतला आहे. या मंदिराच्या नूतन बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच वैदिक मंत्रोच्चारात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.
मरपल्ली व भस्वापूर येथील नागरिकांनी गावात सुसज्ज हनुमान मंदिर उभारण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत डॉ. अजय कंकडालवार यांनी गावाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. शासनाच्या सध्याच्या नियमांनुसार मंदिर बांधकामासाठी शासकीय निधी उपलब्ध करून देणे तातडीने शक्य नसल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. मात्र, ग्रामस्थांच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा आदर राखत स्वतःच्या खर्चातून मंदिर बांधून देण्याचा शब्द त्यांनी दिला.
केवळ आश्वासन देऊन न थांबता डॉ. कंकडालवार यांनी आपल्या शब्दाची पूर्तता करण्याच्या दिशेने पाऊल उचलले. त्यांच्या पुढाकारातून मंदिर बांधकामाचे भूमिपूजन पार पडल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याला गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिर ठरणार श्रद्धा आणि एकतेचे केंद्र :-
मरपल्ली व भस्वापूर ही आदिवासीबहुल भागातील गावे असून, प्रस्तावित हनुमान मंदिर स्थानिक नागरिकांसाठी श्रद्धेचे केंद्र ठरण्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक एकोप्याला बळ देणारे ठरणार आहे. ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत स्वखर्चातून मंदिर उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल दोन्ही गावांतील नागरिकांनी डॉ. अजय कंकडालवार यांचे आभार मानले.
ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळत मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेतल्याने डॉ. कंकडालवार यांच्या या निर्णयाचे अहेरी तालुक्यात कौतुक होत आहे. लवकरच मंदिराचे बांधकाम पूर्ण करून हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
