VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
ग्रामीण व आदिवासीबहुल क्षेत्रातील वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विशेष उपाययोजनांवर भर,
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील दुर्गम, ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागांमध्ये भेडसावणाऱ्या वीजसमस्या प्राधान्याने सोडवून नागरिकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत केली.
नवी दिल्ली येथील विस्तारित संसद भवनातील समिती कक्षात ऊर्जा विभागाच्या संसदीय स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक समितीचे अध्यक्ष श्रीरंग अप्पा बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या लोकसभा क्षेत्रातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या आणि त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे मुद्दे समितीसमोर मांडले.

गडचिरोली जिल्हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असून जिल्ह्यातील अनेक गावे आदिवासीबहुल आणि जंगलव्याप्त भागात आहेत. अशा भागांमध्ये वीज वितरण व्यवस्थेतील अडचणी, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील वीजव्यवस्था सक्षम करण्यासाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे खासदार किरसान यांनी बैठकीत स्पष्ट केले.
वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामांवर, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, लघुउद्योगांच्या कामकाजावर तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे केवळ शहरी भागापुरते मर्यादित न राहता दुर्गम आणि आदिवासीबहुल गावांनाही दर्जेदार वीजसेवा मिळणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

यासाठी ग्रामीण भागातील वीज वितरण यंत्रणेचे बळकटीकरण करणे, आवश्यक ठिकाणी नवीन पायाभूत सुविधा उभारणे, वीजवाहिन्या व वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे आणि वीजपुरवठ्यातील वारंवार होणारे व्यत्यय कमी करण्यासाठी ठोस नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
वीज ही केवळ मूलभूत गरज नसून ग्रामीण भागाच्या शैक्षणिक, कृषी आणि आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील वीजविषयक प्रश्न गांभीर्याने घेऊन त्यांचे प्राधान्याने निराकरण करावे आणि दुर्गम भागातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदीय स्थायी समितीच्या माध्यमातून केली.
