Saturday, October 31, 2026
HomeChamorshiशिक्षणातून परिवर्तनाची नवी ज्योत पेटणार! चामोर्शीत आज ‘दिपस्तंभ’ केंद्राचे उद्घाटन...

शिक्षणातून परिवर्तनाची नवी ज्योत पेटणार! चामोर्शीत आज ‘दिपस्तंभ’ केंद्राचे उद्घाटन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, मार्गदर्शन आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे व्यासपीठ; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार उद्घाटन सोहळा,

गडचिरोली /चामोर्शी, 31 ऑक्टोबर 2026::-शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान मिळविण्याचे साधन नसून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची प्रभावी शक्ती आहे. याच विचाराला केंद्रस्थानी ठेवून चामोर्शी येथे ‘दिपस्तंभ – Centre for Learning and Social Transformation’ या महत्त्वाकांक्षी केंद्राची आज, शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरुवात होत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा देणारा हा उपक्रम चामोर्शीच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

लोकसंध – सोशल एज्युकेशन मूव्हमेंट, यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी आणि पॉलिसी अँड लॉ नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दुपारी १२.३० वाजता यशोधरा विद्यालय, चामोर्शी येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या केंद्राचे उद्घाटन राहुल लोकविकास मंडळाचे संचालक विवेक सहारे यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख वक्ते म्हणून अॅड. सोनाली मेश्राम (गडचिरोली), अॅड. बोधी रामटेके (मुंबई उच्च न्यायालय) आणि शाम रामटेके (लोकसंध – सोशल एज्युकेशन मूव्हमेंट) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशोधरा विद्यालयाचे प्राचार्य राजू धोंडरे भूषविणार आहेत.

शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव आणि वैचारिक प्रबोधनाचा ध्यास:-

‘दिपस्तंभ’ हे केवळ शैक्षणिक केंद्र म्हणून मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण करणे, सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव जागृत करणे, वैचारिक प्रबोधन घडविणे आणि समाजातील विविध घटकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, या व्यापक उद्देशाने कार्य करणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधींसोबतच सामाजिक, वैचारिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ज्ञान, संधी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनू शकतात. याच विश्वासातून सुरू होणारे ‘दिपस्तंभ’ केंद्र भविष्यात चामोर्शी तालुक्यातील शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीला नवी ऊर्जा देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रेरणादायी उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular