VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
पावसाळ्यात नागरिकांचे हाल, शेतकरी-विद्यार्थी-रुग्णांची गैरसोय; तातडीने सर्वेक्षण करून निधी मंजूर करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा,
गडचिरोली/एटापल्ली, 13 नोव्हेंबर 2026::- एटापल्ली तालुक्यातील मुसरमगुडा ते कोटमी फाटा या मार्गाची दुरवस्था आणि रस्त्याअभावी नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास लक्षात घेता, या मार्गाचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) गडचिरोली जिल्हा समितीने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. केवळ आश्वासनांवर वेळकाढूपणा न करता रस्त्याचे सर्वेक्षण करून निधी मंजूर करावा आणि प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करावी, अशी ठाम मागणी पक्षाने केली आहे.
मुसरमगुडा ते कोटमी फाटा हा मार्ग परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, डांबरी रस्त्याअभावी नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून ये-जा करणे कठीण होत असून शेतकऱ्यांची शेतीविषयक कामे, विद्यार्थ्यांचा शाळा-महाविद्यालयातील प्रवास तसेच रुग्णांना आरोग्यसेवा मिळवताना मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याची खंत CPI ने व्यक्त केली आहे.
या रस्त्याचा तातडीने प्रत्यक्ष पाहणीसह तांत्रिक सर्वेक्षण करण्यात यावे, आवश्यक अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळवावी आणि पात्रतेनुसार ग्रामीण रस्ते विकास योजना किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी उपलब्ध करून डांबरीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच रस्त्याच्या मंजुरीची सद्यस्थिती आणि प्रस्तावित कार्यवाहीबाबत प्रशासनाने लेखी माहिती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
‘केवळ आश्वासने नकोत, प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू करा’ :-
यावेळी CPI जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार म्हणाले, “ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना आजही चांगल्या रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. मुसरमगुडा ते कोटमी फाटा हा रस्ता नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सर्वेक्षण करावे, निधी मंजूर करावा आणि प्रत्यक्ष बांधकाम सुरू करावे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा संघर्ष सुरूच राहील.”
CPI गडचिरोली जिल्हा समितीचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली गावकरी व गाव पाटील राशीनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
प्रशासनाने मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
