VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली बसस्थानकात लोकार्पण व पूजन सोहळा; ई-चार्जिंग स्टेशनचेही उद्घाटन, चार प्रमुख मार्गांवर धावणार बसेस,
गडचिरोली, 13 नोव्हेंबर 2026::-गडचिरोली जिल्ह्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक स्वरूप देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गडचिरोली आगारासाठी नव्याने उपलब्ध झालेल्या १५ अत्याधुनिक ‘शिवाई इलेक्ट्रिक’ बसेसचा लोकार्पण व पूजन सोहळा गडचिरोली बसस्थानकात उत्साहात पार पडला. यावेळी इलेक्ट्रिक बसेसच्या संचालनासाठी उभारण्यात आलेल्या ई-चार्जिंग स्टेशनचेही उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने या १५ इलेक्ट्रिक बसेस गडचिरोली आगाराला उपलब्ध झाल्या आहेत.
या बसेस गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चंद्रपूर, गडचिरोली-अहेरी आणि गडचिरोली-मुरुमगाव या प्रमुख मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा मिळणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आधुनिक इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
इलेक्ट्रिक बसेसच्या नियमित व सुरळीत संचालनासाठी ई-चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नव्या बसेसच्या समावेशामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला आधुनिकतेची नवी दिशा मिळणार आहे.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजयुमोचे हरिश माकडे, शुभम बाळेकरमकर, यश कोंडावार, सतीश पेंडोरकर, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सनियंत्रण समिती क्रमांक ३ चे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने, प्रादेशिक अभियंता महेंद्रकुमार नेवारे, गडचिरोली विभागाचे विभाग नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडस्कर, यंत्र अभियंता छगन डिवसे, विभागीय वाहतूक अधिकारी कन्हैया भोगे तसेच गडचिरोली आगार व्यवस्थापक सचिन नेवारे उपस्थित होते.
