Friday, November 13, 2026
HomeBhamragadअतिदुर्गम होड्रीत क्रीडा स्पर्धांचा जल्लोष! राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या हस्ते व्हॉलीबॉल-कबड्डी स्पर्धेचे दिमाखात...

अतिदुर्गम होड्रीत क्रीडा स्पर्धांचा जल्लोष! राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या हस्ते व्हॉलीबॉल-कबड्डी स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; युवकांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा – राजे अम्ब्रिशराव महाराज,

गडचिरोली /भामरागड, 14 नोव्हेंबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भामरागड तालुक्यातील होड्री येथे क्रीडा उत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. जय काटेकोसा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल व कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या स्पर्धेच्या निमित्ताने परिसरातील युवक, खेळाडू आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

उद्घाटनप्रसंगी युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम, अर्जुन आलाम (भाजपा तालुकाध्यक्ष, भामरागड), विकास तोडसाम (भाजपा तालुकाध्यक्ष, अहेरी), वैभव सोमकुंवर, राकेश कोसरे, सुनील बिश्वास (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष), तापेस हलदार (नगर उपाध्यक्ष, भामरागड), भिक्का विडपी (गाव पाटील), ज्ञानेश्वर भांडेकर, कवीश्वर मोतकूरवार, गुलशन भांडेकर, रैनू तिम्मा, झाकीर हुसैन आदी मान्यवर उपस्थित होते.

पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ मदतीची मागणी :-

या कार्यक्रमादरम्यान राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या पाच तालुक्यांतील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अपेक्षित पाऊस न झाल्याने धानपिकांवर विपरीत परिणाम झाला असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व दिलासा द्यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी एकत्र यावे :-

अतिदुर्गम भागात भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल होड्री येथील नागरिक व आयोजकांचे राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी विशेष कौतुक केले. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील युवकांना आपले क्रीडागुण दाखविण्याची संधी मिळते. त्याचबरोबर गावातील युवक, नागरिक आणि लहान मुले एकत्र येऊन सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि एकजूट अधिक मजबूत होते. युवकांनी केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा आणि गावातील समस्या सोडविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यस्तरीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव :-

होड्री गावातील दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवून गावाचा नावलौकिक वाढविल्याबद्दल राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अतिदुर्गम भागातून राज्यस्तरापर्यंत मजल मारणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना योग्य संधी व प्रोत्साहन मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विजेत्या संघांवर बक्षिसांची बरसात :-

ग्रामीण व आदिवासी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांच्या वतीने आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. व्हॉलीबॉल स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघाला २५ हजार १ रुपये माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्याकडून, द्वितीय क्रमांकासाठी २० हजार १ रुपये राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्याकडून, तर तृतीय क्रमांकासाठी १५ हजार १ रुपये युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांच्याकडून देण्यात येणार आहेत.

अतिदुर्गम होड्री गावात आयोजित या भव्य क्रीडा स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. ग्रामीण भागातील सुप्त क्रीडागुणांना वाव देण्यासोबतच युवकांमध्ये एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि विकासाची नवी उमेद निर्माण करणारा हा उपक्रम ठरत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular