Friday, November 13, 2026
HomeBhamragadभामरागडमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! दुष्काळ जाहीर करण्यासाठी CPI-किसान सभेचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा...

भामरागडमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! दुष्काळ जाहीर करण्यासाठी CPI-किसान सभेचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

‘दुष्काळग्रस्त घोषित करा, नुकसानभरपाई तातडीने द्या’च्या घोषणांनी भामरागड दुमदुमले; पीक नुकसानीचे पंचनामे व आर्थिक मदतीसाठी प्रशासनाला निवेदन,

गडचिरोली /भामरागड, १२ नोव्हेंबर २०२६ :-अनियमित पाऊस, पावसातील दीर्घ खंड, किडींचा प्रादुर्भाव आणि मुरासू चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, संपूर्ण भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) आणि ऑल इंडिया किसान सभा (AIKS), गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने गुरुवारी भामरागड येथे भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला. ‘भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा’, ‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या’ अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहापासून मोर्चाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना सादर करण्यात आले.

यंदाच्या खरीप हंगामात प्रतिकूल हवामानामुळे भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांची वाढ खुंटली, तर किडींच्या प्रादुर्भावानेही उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. परिणामी अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा मावळल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड आणि आगामी हंगामासाठी बियाणे, खते व मशागतीचा खर्च भागवायचा कसा, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली. तालुक्यातील सर्व गावांमध्ये खरीप पिकांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करावेत. महसूल व कृषी विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून नुकसानीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करावा आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

याशिवाय पात्र शेतकऱ्यांना पीक विमा आणि दुष्काळ निवारण योजनांचा लाभ द्यावा, कृषी कर्जाबाबत आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, पुढील हंगामासाठी बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, तसेच कोणताही पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा :-

नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळाली नाही, तर त्यांची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी भूमिका मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आली.

CPI आणि ऑल इंडिया किसान सभेच्या या आंदोलनातून भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मागण्या प्रशासनासमोर ठामपणे मांडण्यात आल्या. आता शासन या मागण्यांची कितपत दखल घेते आणि दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular