VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
१५ नोव्हेंबरला गडचिरोलीत भव्य मुख्य शासकीय सोहळा; वाहतूक, सुरक्षा, पार्किंग, स्वच्छता व नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश,
पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार उद्घाटन; सर्व विभागांना समन्वयातून तयारी पूर्ण करण्याच्या सूचना,
गडचिरोली,13 नोव्हेंबर 2026 :-भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या जनजातीय गौरव दिनाच्या देशस्तरीय मुख्य शासकीय सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी जिल्हा क्रीडा संकुलातील कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन विविध व्यवस्थांची सविस्तर पाहणी केली. नागरिकांच्या सुविधांपासून ते सुरक्षा व्यवस्थेपर्यंत प्रत्येक बाबीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा मुख्य आकर्षण असलेला जनजातीय गौरव दिनाचा देशस्तरीय शासकीय सोहळा १५ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे.
मंत्री डॉ. उईके यांनी कार्यक्रमस्थळावरील प्रेक्षकांची बैठक व्यवस्था, नागरिकांचे प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहनतळ, वाहतूक नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छता तसेच सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीचे योग्य नियोजन करावे. नागरिकांना येताना व परत जाताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, यासाठी वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्था काटेकोरपणे करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
कार्यक्रमस्थळावरील सुरक्षा व्यवस्थेचा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्याकडून आढावा घेताना प्रमुख अतिथी, निमंत्रित मान्यवर, कलावंत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला. प्रवेशद्वारांवर गर्दी होणार नाही, तसेच कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस आणि प्रशासनाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्यासाठी विविध भागांतून येणाऱ्या कलावंतांच्या निवास, भोजन आणि येण्या-जाण्याच्या व्यवस्थेचीही त्यांनी माहिती घेतली. कलावंतांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, त्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणासाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच प्रमुख अतिथींचे आगमन, स्वागत, प्रवेश आणि बैठक व्यवस्थेचेही त्यांनी निरीक्षण केले.
कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असाव्यात, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. देशस्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कोणत्याही विभागाकडून हलगर्जीपणा होऊ नये. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून उर्वरित कामे वेळेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार नामदेव उसेंडी यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
