VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत पाच प्रमुख मार्गांवर जड वाहनांना बंदी; प्रवासी बसेसना सूट, वाहतूकदारांसाठी पर्यायी मार्ग निश्चित,
गडचिरोली, 13 नोव्हेंबर 2026 :-भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे १५ नोव्हेंबर रोजी आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वाहतुकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोहळ्यादरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाच प्रमुख मार्गांवरील जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेश जारी केला आहे.
गडचिरोली येथे होणाऱ्या या मुख्य सोहळ्याला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसह सुमारे आठ हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, नागरिकांची गैरसोय टाळावी आणि कार्यक्रमस्थळ परिसरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी, या उद्देशाने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या आदेशानुसार चामोर्शी–नागपूर, धानोरा–नागपूर, आरमोरी–धानोरा–चामोर्शी, चंद्रपूर–चामोर्शी आणि धानोरा–चंद्रपूर या पाच मार्गांवर दोन्ही दिशांनी जड वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. मात्र, प्रवासी बसेसना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.
जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित :-
वाहतूकदारांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने पाचही मार्गांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. त्यानुसार चामोर्शी–नागपूर मार्गावरील वाहनांनी हरणघाट, चांदापूर, मूल, सिंदेवाही व नागभीड मार्गाचा वापर करावा. धानोरा–नागपूर मार्गावरील वाहनांसाठी चातगाव, मुरमाडी, मौशीखांब, वडधा, पोर्ला, आरमोरी व ब्रह्मपुरी हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
आरमोरी–धानोरा–चामोर्शी मार्गावरील जड वाहनांनी पोर्ला टी-पॉइंट, वडधा, मौशीखांब, चातगाव, खुटगाव, कारवाफा, पोटेगाव, घोट मार्गे चामोर्शी येथे जावे. चंद्रपूर–चामोर्शी मार्गावरील वाहनांसाठी मुरखडा, मुडझा, वाकडी फाटा, शिवणी व तळोधी हा पर्यायी मार्ग राहणार आहे. तर धानोरा–चंद्रपूर मार्गावरील वाहनांनी चातगाव, खुटगाव, कारवाफा, घोट, चामोर्शी व मूल मार्गाचा वापर करावा.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई :-
वाहतूक निर्बंधांच्या कालावधीत जड वाहनचालक व वाहतूकदारांनी निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करावा. मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ११५ व ११६ नुसार हे निर्बंध लागू करण्यात आले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
जनजातीय गौरव दिनाचा मुख्य सोहळा निर्विघ्न पार पडावा आणि नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, यासाठी वाहनचालक, वाहतूकदार तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या वाहतूक नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
