VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोलीतील आनंद लॉन येथे गडचिरोली व सावली तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; एकजूट आणि संघटनात्मक विषयांवर मनमोकळी चर्चा,
गडचिरोली, 13 नोव्हेंबर 2026:-दिवाळीच्या निमित्ताने गडचिरोली येथील आनंद लॉनमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात गडचिरोली व सावली तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट झाली. या सोहळ्याला राज्याचे विधिमंडळ नेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मनमोकळा संवाद साधला. पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सण-उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या स्नेहमिलनातून कार्यकर्त्यांमधील परस्पर संवाद आणि समन्वयाला व्यासपीठ मिळाले.
या प्रसंगी आमदार रामदास मसराम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष पंकज गुड्डेवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, नगरसेवक रमेश चौधरी, नंदू वाईलकर, श्रीकांत देशमुख, नंदू कायरकर, पराग पोर्रेडीवार, दामदेव मंडलवार, अब्दुलभाई पंजवानी, रुपेश टिकले, दत्तात्रय खरवडे, विवेक घोंगडे, मोहन वर्गंटीवार यांच्यासह गडचिरोली व सावली तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवाळीच्या आनंदमयी वातावरणात पार पडलेल्या या स्नेहमिलन सोहळ्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र येत विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली. आपुलकी, संवाद आणि संघटनात्मक समन्वय अधोरेखित करणारा हा स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.
