VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांतभाऊ कुत्तरमारे यांची उपस्थिती; गांधीनगर तरुण क्लब मंडळाच्या क्रीडा उपक्रमाचे कौतुक,
गडचिरोली /मुलचेरा, 14 नोव्हेंबर 2026 :-तालुक्यातील गांधीनगर व कालीनगर येथील काली मंदिरात दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांशी सदिच्छा भेट घेतल्यानंतर गांधीनगर तरुण क्लब मंडळाच्या वतीने आयोजित दहा दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरी व बक्षीस वितरण समारंभाला उपस्थिती दर्शविण्यात आली. या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांमध्ये क्रीडाविषयक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या दहा दिवसांपासून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.
गांधीनगर तरुण क्लब मंडळाच्या वतीने ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा तसेच गावागावांतील युवकांमध्ये एकोपा, संघभावना आणि खेळाडूवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दहा दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध संघांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी विजयासाठी केलेले प्रयत्न, फलंदाजी आणि गोलंदाजीतील कौशल्य यामुळे मैदानावर चांगलीच रंगत निर्माण झाली.
स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांसह बक्षीस वितरण समारंभाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांतभाऊ कुत्तरमारे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आयोजक मंडळाचे कौतुक करत ग्रामीण भागातील युवकांसाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. खेळामुळे युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, मेहनत आणि संघभावना विकसित होते. त्यामुळे युवकांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध करावे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी उरेते सर, बदल जी, शाहा, विधान वैद्य, संजयभाऊ सरकार, तपनदादा, डॉ. सोनातनजी, किशोरभाई, रणजीत मंडल, उषा मंडल, शर्मा जी, सुभाष गणपती जी, मोंटू सरकार, सरपंच आकुलदादा, पुरंजन सरकार, गेन जी, गणेश जी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमामुळे गांधीनगर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गांधीनगर तरुण क्लब मंडळाने पुढाकार घेऊन दहा दिवस क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याने परिसरातील युवक व क्रीडाप्रेमींनी आयोजकांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना संधी देणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
