VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
नागपूरच्या रवी भवन येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक; आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीवर सविस्तर मंथन,
नागपूर, 16 नोव्हेंबर 2026 :-आदिवासीबहुल लोकसभा व विधानसभा क्षेत्रांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या वतीने जनजातीय संकुल विकास परियोजनेच्या अनुषंगाने नागपूर येथील रवी भवन येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आदिवासी क्षेत्रांच्या विकासासाठी ठोस नियोजन, विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी आणि स्थानिक प्रश्न सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला भाजपा महाराष्ट्राचे सह संघटन मंत्री सतीशजी धोंड, राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार राजू तोडसाम, कपिल सहस्रबुद्धे, ST मोर्चाचे महामंत्री आकाश मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जनजातीय संकुल विकास परियोजनेच्या माध्यमातून आदिवासीबहुल भागातील विकासाच्या विविध संधी आणि स्थानिक गरजांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. आदिवासी समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नती साधण्यासोबतच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आरोग्य व शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
आदिवासीबहुल क्षेत्रांचा विकास केवळ योजनांपुरता मर्यादित न ठेवता स्थानिक परिस्थिती, नागरिकांच्या गरजा आणि उपलब्ध संसाधने लक्षात घेऊन विकासाचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, संघटनात्मक पदाधिकारी आणि शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय निर्माण करून विकासकामांना गती देण्याबाबतही चर्चा झाली.
जनजातीय संकुल विकास परियोजना ही आदिवासीबहुल क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण संकल्पना असून, या माध्यमातून आदिवासी समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा दृष्टिकोन बैठकीत मांडण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे आदिवासीबहुल क्षेत्रांच्या विकासासाठी आगामी काळात कोणत्या दिशेने नियोजन करावे, याबाबत विचारमंथन झाले असून, जनजातीय संकुल विकास परियोजनेच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण दिशा निश्चित करण्यास मदत होणार आहे.
