VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
आदिवासीबहुल चार तालुक्यांना मिळणार फिरत्या रुग्णालयाचा लाभ; ६.६२ कोटींच्या आरोग्य सुविधांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन,
गडचिरोली, 15 नोव्हेंबर 2026 :- जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल गावांमधील नागरिकांना आता उपचारासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज कमी होणार आहे. आरोग्यसेवा थेट गावाच्या दारात पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ या महत्त्वाकांक्षी फिरत्या रुग्णालय प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका सेवेसाठी १ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, एकूण ६ कोटी ६२ लाख रुपयांच्या आरोग्य सुविधांमुळे दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेला मोठे बळ मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि मुलचेरा या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये अनेक गावे आजही दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. विशेषतः पावसाळ्यात रस्ते आणि दळणवळणाच्या अडचणींमुळे नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळणे कठीण होते. अनेकदा साध्या आजारांवरील उपचारांसाठीही नागरिकांना लांबचा प्रवास करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून निश्चित वेळापत्रकानुसार वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज वाहन दुर्गम गावांमध्ये पोहोचणार आहे. गावातच नागरिकांची आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, आवश्यक वैद्यकीय चाचण्या आणि औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. विशेषतः माता व बाल आरोग्य, हिवताप, क्षयरोग आणि कुपोषण यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचे वेळीच निदान करून रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
रुग्णवाहिका सेवेमुळे गंभीर रुग्णांना मिळणार तातडीची मदत :-

फिरत्या रुग्णालयासोबतच दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत पुढील उपचारासाठी आरोग्य संस्थांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी ६३ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ प्राथमिक उपचारच नव्हे, तर गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी तातडीने हलविण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
आदिवासी बांधवांच्या आरोग्याला प्राधान्य :-
खनिज संपत्तीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील नागरिकांना विकासाच्या सुविधांचा लाभ मिळावा, या उद्देशाने जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दुर्गमतेमुळे आरोग्यसेवेपासून वंचित राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ हा उपक्रम दिलासादायक ठरणार आहे. आरोग्य तपासणीपासून औषधोपचारांपर्यंतच्या सुविधा गावातच उपलब्ध होणार असल्याने वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास वाचणार आहे. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
