VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शासकीय कामांसाठी शहरात येणाऱ्या बळीराजाची मोठी गैरसोय; आधुनिक सुविधांनीयुक्त नवीन किसान भवन उभारण्याची शेतकरी नेते राजेश ठाकूर यांची प्रशासनाकडे मागणी,
गडचिरोली /चामोर्शी, 16 नोव्हेंबर 2026 :-तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध शासकीय, कृषीविषयक तसेच शेतीमालाच्या खरेदी-विक्रीच्या कामांसाठी दररोज शेकडो शेतकरी चामोर्शी शहरात येत असतात. मात्र, शहरात येणाऱ्या या शेतकऱ्यांच्या निवासाचा आणि विश्रांतीचा प्रश्न आजही गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या जुन्या किसान भवनाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, इमारतीच्या परिसरात झाडाझुडपांसह गवत आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेली ही सुविधा असूनही तिचा प्रत्यक्ष उपयोग होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
चामोर्शी तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असल्याने तालुक्यातील अनेक गावांमधून शेतकरी विविध कामांसाठी चामोर्शी शहरात येतात. तहसील कार्यालय, कृषी विभाग, पंचायत समिती, बँका, बाजारपेठ तसेच इतर शासकीय कार्यालयांतील कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेकदा दिवसभर थांबावे लागते. काही वेळा कामे वेळेत पूर्ण न झाल्यास रात्री मुक्काम करण्याचीही वेळ येते. मात्र, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी योग्य निवासव्यवस्था आणि विश्रांतीची सोय उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेली किसान भवनाची जुनी इमारत आज जीर्ण अवस्थेत असून, इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडाझुडपे व गवत वाढले आहे. परिसरात कचरा साचलेला असून स्वच्छता आणि देखभालीअभावी या ठिकाणाची दुरवस्था झाली आहे. शेतकऱ्यांसाठी असलेली वास्तू वापराविना पडून असल्याने शासनाच्या सुविधेचा मूळ उद्देशच हरवल्याचे दिसून येत आहे.
आधुनिक सुविधांनीयुक्त किसान भवन उभारण्याची मागणी :-
शेतकऱ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी चामोर्शी शहरात आधुनिक सुविधांनीयुक्त नवीन किसान भवन (शेतकरी विश्रामगृह) उभारण्यात यावे, अशी मागणी शेतकरी नेते राजेश ठाकूर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
नवीन किसान भवनामध्ये शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र व प्रशस्त विश्रांती कक्ष, कॅन्टीनची सुविधा, महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सुरक्षित वाहनतळ, स्वच्छतागृह, स्नानगृह, २४ तास पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच माफक दरात भोजन, चहा-नाश्त्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या श्रमातूनच देशाची प्रगती साधली जाते. मात्र, शासनाच्या कामांसाठी शहरात येणाऱ्या शेतकऱ्यांना साध्या निवास व विश्रांतीच्या सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. त्यामुळे प्रशासनाने जुन्या किसान भवनाच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन चामोर्शी येथे सर्व सोयींनी युक्त नवीन किसान भवन उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून निधीची तरतूद करावी आणि बांधकामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते राजेश ठाकूर यांनी केली आहे.
