VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,२२ ऑक्टोंबर २०२३ ::- रोजी नैनपुर (वडसा) ता. देसाईगंज (वडसा) येथे सार्वजनिक महिला शारदा उत्सव मंडळ नैनपुरच्या वतीने आयोजित “संत गोरा कुंभार” या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडी यांचे हस्ते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी बोलतांना डॉ. किरसान यांनी मोदी सरकार करीत असलेल्या सार्वजनिक उपक्रमांच्या खाजगीकरणाविरुद्ध व महाराष्ट्रातील भाजप प्रणित सरकारने शासकीय नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाविरुद्ध काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरू असल्याचे सांगितले. खाजगी क्षेत्रातील पंचपदी लोक व कंत्राटदार आपल्या मर्जीतील लोक नियुक्त करतील त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एससी एसटी ओबीसिंना मिळणारे आरक्षण राहणार नाही. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या संधी पासून व संवैधानिक अधिकारापासून युवकांना वंचित ठेवले जाईल. करिता याला वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
जिल्ह्यात नरभक्षी वाघाची दहशत व रानटी हत्तींच्या धुमाकुळामुळे पिकांची व घरांची नासाडी, हत्तींच्या हल्ल्यात जीवितहानी या समस्यांच्या निराकरणासाठी वन विभागाच्या कार्यालयाला काँग्रेस पक्षातर्फे घेराव घालण्यात आला व वाघांच्या व रानटी हत्तींचा बंदोबस्त त्वरित करावा याची मागणी करण्यात आली व मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल याची जाणीव वन विभागास करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भाजप सरकारने सरकारी नोकऱ्या बंद करण्याचा घाट घातल्यामुळे बेरोजगारीत वाढ झालेली आहे. वाढत्या बेरोजगारी सोबतच महागाई सुद्धा गगनाला भिडलेली आहे. गॅस सिलेंडर भरण्याचे दर तिप्पटीने, खाद्यतेलाचे दर दुप्पटीने व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आलेले आहेत याची जाणीव ठेवून याचा प्रतिकार करा असे आव्हान त्यांनी केले.
यावेळी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी पंचायत समिती उपाध्यक्ष नितीन राऊत, सामाजिक कार्यकर्ता रामदासजी मसराम तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
