VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,२२ फेब्रुवारी २०२४::- आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने अभिकर्ता म्हणून आदिवासी विविध कार्यकारी संस्था मार्फत धान खरेदी केली जाते. या वर्षी डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील संस्थे मार्फत लाखो क्वीटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. परंतु आजतागायत कुठल्याही केंद्रावरून धानाची उचल झालेली नाही. काही संस्था उघड्यावर खरेदी करीत असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व संस्थाना धान उचल न केल्याने मोठी तुट निर्माण होण्याची भीती आहे.
आधारभूत खरीप हंगाम २०२३-२०२४ संपण्याच्या मार्गावर असून खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची गर्दी कमी झालेली आहे. या वर्षी मागील वर्षीपेक्षा धानाची आवक घटलेली आहे. त्यामुळे खरेदी केंद्राच्या समस्या वाढलेल्या आहेत.
शासन निर्णयानुसार खरेदी केल्यानंतर दोन महिन्यात धान उचल करावयाची असताना सुद्धा आदिवासी विकास महामंडळ याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते. बहुतांश केंद्रावरील धान उघड्यावर ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले आहेत. तापमानातील बदलामुळे अवकाळी पाऊस अधून मधून येत असल्याने उघडयावरील धान भिजून धानाची नासाडी होण्याची श्यकता आहे.
धानाची उचल त्वरित करण्यात यावी व आदिवासी विविध संस्थांना होणारा आर्थिक फटका कमी करावा अशी मागणी श्री. प्रणय खुणे,प्रदेशअध्यक्ष, राष्ट्रीय मानवाधिकार संगठन (दिल्ली) यांनी केली आहे.
