Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliराष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात साजरा...

राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात साजरा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, १६ मे २०२५::- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली “तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा – डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.कोटगल येथे आयोजित प्रभातफेरीचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच श्रीमती ममता दूधबावरे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, जिल्हास्तरीय अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रभातफेरीद्वारे नागरिकांमध्ये डेंग्यूविषयी जागृती करण्यात आली.प्रभातफेरीनंतर कोटगल ग्रामपंचायत कार्यालयात मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. प्रफुल गोरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. दिवाकर भोयर, उपसरपंच श्रीमती तेजप्रभा भोयर, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती मीना मेश्राम व श्री. विश्वनाथ भोयर, ग्रामविस्तार अधिकारी श्री. नीलकंठ मारगाये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल हुलके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम, डॉ. बागराज धुर्वे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पोर्ला येथील डॉ. बासू नरोटे, डॉ. पूजा धुळे मंचावर उपस्थित होते.डेंग्यूचा प्रसार आणि प्रतिबंध यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती डासामुळे होतो,

जो स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतो. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, पाण्याच्या साठ्यांवर झाकण ठेवावे, कुलर, हौद, ड्रिप पॅन नियमित स्वच्छ करावा, नाल्यांची सफाई करावी, डासोत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करावीत, तसेच गप्पी मासे सोडावेत अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या.डेंग्यूची लक्षणे – एकाएकी ताप येणे, डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, अंगावर पुरळ, उलट्या, भूक मंदावणे, रक्तस्त्राव यांची माहिती देऊन नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तातडीने नजीकच्या सरकारी रुग्णालयात मोफत तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले. इलायझा टेस्ट ही डेंग्यू निदानासाठीची विश्वसनीय चाचणी असून, जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेन्टिनल सेंटरमध्ये ही चाचणी मोफत उपलब्ध आहे.कार्यक्रमाचे संचालन श्री. राजेश कार्लेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. प्रकाश बारसागडे यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पोर्ला येथील अधिकारी, कर्मचारी तसेच हिवताप व हत्तीरोग विभागाने मोलाचे सहकार्य केले.जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर प्रभातफेरी व जनजागृती उपक्रम राबवून राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके यांनी दिली.डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून डासमुक्त गाव व शहर घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular