Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliगडचिरोली दक्षिण भारताचे प्रवेशद्वार बनणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन...

गडचिरोली दक्षिण भारताचे प्रवेशद्वार बनणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी, 

गडचिरोली ,२९ नोव्हेंबर २०२५::- भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर गडचिरोलीत विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान झालेली असून लवकरच गडचिरोली जिल्हा दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी गडचिरोली येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा संपूर्ण आराखडा जनतेसमोर मांडला.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, अनेक वर्षांपर्यंत गडचिरोलीला महाराष्ट्राचा शेवटचा मागास जिल्हा म्हणून हिणवले गेले. मंत्रालयात शिक्षा म्हणून गडचिरोलीला पाठवण्याची भाषा केली जायची. परंतु, आता हे षडयंत्र संपुष्टात आले आहे. आज गडचिरोली राज्याच्या विकासाच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शहरांच्या विकासासाठी स्मार्ट सिटी आणि अटल अमृत योजना आणल्या, ज्यातून महाराष्ट्राला ५० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. गडचिरोली शहराला एक विकसित शहर म्हणून रूप देण्यासाठी आपल्या कार्यकाळात भुयारी गटार योजना, पिण्याच्या पाण्याची योजना आणि सिमेंट-काँक्रिटचे रस्ते यासाठी सुमारे ७०० ते ८०० कोटींची कामे करण्यात आली. १३० कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना भाजपची सत्ता आल्यावर तातडीने मंजूर केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. ते म्हणाले लवकरच या जिल्ह्यात ३ लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येणार आहे, ज्यामुळे गडचिरोली नेक्स्ट स्टील हब बनेल. ही गुंतवणूक टाटा नगरपेक्षाही मोठी असेल. विशेषतः, यातून तयार होणाऱ्या रोजगारावर जिल्ह्याच्या भूमिपुत्रांचा पहिला अधिकार असेल. तसेच, विकास करत असताना गडचिरोलीच्या जल, जमीन आणि जंगल या तीन तत्वांचे पूर्णपणे संवर्धन केले जाईल, अशी हमी त्यांनी दिली.

गोंडवाना विद्यापीठाने ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन युनिव्हर्सिटीसोबत करार करून मायनिंग इंजिनिअरिंगचे जागतिक दर्जाचे संयुक्त अभ्यासक्रम सुरू केले आहेत. लवकरच गडचिरोलीतील शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये सुपर स्पेशालिटी सुविधा आणल्या जातील, जेणेकरून कोणत्याही नागरिकाला उपचारांसाठी नागपूर किंवा हैदराबादला जाण्याची गरज पडणार नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गडचिरोलीला ‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार’ बनवण्यासाठी आगामी तीन ते चार महिन्यांत विमानतळ निर्मितीला सुरुवात करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.

यावेळी मंचावर आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, प्रकाश पोरेड्डीवार, योगिता पिपरे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. प्रणोती निंबोरकर आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर, वडसा नगरपालिकेच्या उमेदवार लता सुंदरकर आणि आरमोरीचे उमेदवार रूपेश पुणेकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular