VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
विद्यार्थ्यांनी अनुभवली प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रिया,
गडचिरोली/चामोर्शी,०६ ऑगस्ट २०२६::- विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, भेंडाळा येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल आधारित EVM प्रणालीद्वारे अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेचा अनुभव देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांनी मोबाईल EVM च्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. पारदर्शक, जलद आणि अचूक पद्धतीने मतदान व मतमोजणी पूर्ण करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, मतदानाचे महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत जागरूकता निर्माण झाली.

निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून ओम सुनील येगोलपवार, उपमुख्यमंत्री म्हणून कु. स्वीटी संजय वालदे, स्वच्छता मंत्री म्हणून कु. श्रुती बिकोधर मंडल, सांस्कृतिक मंत्री म्हणून कु. लावण्या विकास पोरटे, क्रीडा मंत्री म्हणून संस्कार श्रावण सातपुते, आरोग्य मंत्री म्हणून कु. विनिता ऋषीं चौधरी तसेच सहल मंत्री म्हणून मनीष मोरेश्वर साखरे यांची निवड झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अरुण राऊत होते. यावेळी पर्यवेक्षक श्री. प्रशांत मुप्पीडवार, ज्येष्ठ शिक्षक श्री. अरुण चौधरी, श्री. गोकुळ झाडे, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षक-पालक संघाचे माजी उपाध्यक्ष श्री. लचमा शिरगावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडणुकीत केंद्राध्यक्ष म्हणून श्री. गोकुळ झाडे यांनी जबाबदारी पार पाडली. तर पोलिंग अधिकारी म्हणून वैभव आईचवार, अक्षय पिलारे आणि योगेश नवघडे यांनी संपूर्ण मतदान प्रक्रिया शिस्तबद्ध, पारदर्शक आणि यशस्वीरीत्या पूर्ण केली.
यानंतर नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. मुख्याध्यापक श्री. अरुण राऊत यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे, शिस्तीने आणि जबाबदारीने आपल्या पदाची कर्तव्ये पार पाडण्याचे आवाहन केले. तर ज्येष्ठ शिक्षक श्री. अरुण चौधरी यांनी नेतृत्वगुण विकसित करून विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करण्याचा संदेश दिला.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांचे शिक्षण देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
