Friday, July 31, 2026
HomeGadchiroliजिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट आदेश प्रकरणी नगर पंचायत चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरेला अटक...

जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट आदेश प्रकरणी नगर पंचायत चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरेला अटक…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

छत्रपती संभाजी नगर इथून अटक,

४ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी,

तपासात आणखी मोठी नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गडचिरोली ,३० जून २०२६::- जिल्हा खनिकर्म प्राधिकरणांतर्गत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या निधीवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेड व स्वाक्षरीचा वापर करून प्रशासकीय मान्यतेचे खोटे पत्र तयार केल्याप्रकरणी चामोर्शी नगरपंचायतीचा स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे याला गडचिरोली पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ४ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण :- ?

२२ जून रोजी गडचिरोली जिल्हा खनिकर्म कार्यालयातील ऑपरेटर राहुल रेवाडे यांना गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक लीलाधर भरडकर यांनी प्रशासकीय मान्यतेचा पीडीएफ आदेश पाठवून संबंधित कामांना मंजुरी मिळाली आहे का, अशी विचारणा केली. कार्यालयाच्या नोंदी तपासल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही मंजुरी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर हे पत्र सहायक जिल्हा खनिकर्म अधिकारी राहुल राठोड यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी प्राथमिक पडताळणी करून ते जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांच्या निदर्शनास आणून दिले. तपासात पत्रावरील लेटरहेड आणि स्वाक्षरी बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी हे प्रकरण पोलिस अधीक्षकांकडे पाठवले.

राठोड यांच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.

छत्रपती संभाजीनगरमधून अटक :- 

तपासादरम्यान बनावट पत्र पाठविणारा आशिष पिपरे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथे कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. सोमवारी अटक दाखवून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण :- 

आशिष पिपरेची पत्नी चामोर्शी नगरपंचायतीत भाजपची नगरसेविका आहे, तर पिपरे स्वतः स्वीकृत नगरसेवक आहे. यापूर्वी एका प्रकरणात आरोप झाल्यानंतर भाजपने त्याच्यापासून अंतर ठेवले होते. त्यानंतर तो काँग्रेसच्या गोटातून स्वीकृत नगरसेवक झाला. मात्र, त्याचे काही भाजप नेत्यांशीही संबंध कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आणखी मोठ्या नावांचा शोध :-

या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. बनावट कागदपत्रे कोणी तयार केली, आर्थिक व्यवहार कोणामार्फत झाले, मोबाईल आणि डिजिटल पुराव्यांद्वारे कोणाशी संपर्क झाला, याचा कसून तपास सुरू आहे. तपास निष्पक्षपणे पुढे गेल्यास या प्रकरणातील आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular