Sunday, September 13, 2026
HomeEtapalliपंचायत समिती व नगर पंचायत एटापल्ली कोरोना भत्ता देणार...

पंचायत समिती व नगर पंचायत एटापल्ली कोरोना भत्ता देणार…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

भाकपा व आयटकचा विजय,

गडचिरोली /एटापल्ली,०२ जून २०२६::- कोरोना काळात जीवाची पर्वा न करता गावागावात जाऊन सेवा देणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या २८ महिन्यांच्या भत्त्याबाबत अखेर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून पंचायत समिती एटापल्ली व नगर पंचायत एटापल्ली यांनी हा भत्ता देण्यास मान्यता दर्शवली आहे. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) व आयटक (AITUC) यांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेचा कणा बनून काम करणाऱ्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी घराघरात जाऊन सर्वेक्षण, जनजागृती, रुग्णांची देखभाल अशी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. मात्र शासन आदेश असूनही तब्बल सहा वर्षे उलटून गेली तरी त्यांना २८ महिन्यांचा भत्ता मिळाला नव्हता. यामुळे संताप व्यक्त होत होता.

या अन्यायाविरोधात भाकपा व आयटकच्या नेतृत्वाखाली १ जुलै रोजी पंचायत समिती एटापल्ली समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यासंदर्भात पंचायत समिती एटापल्ली तसेच मुख्याधिकारी, नगरपंचायत एटापल्ली यांना निवेदन सादर करण्यात आले होते.

कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव भाकपा व आयटक अध्यक्ष अहेरी विधानसभा यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला होता की, आशा व गटप्रवर्तकांना तात्काळ थकीत भत्ता देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत भत्ता देण्याचा निर्णय घेतला.

गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे यांनी सांगितले की, “आशा व गटप्रवर्तकांचा थकीत भत्ता त्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत ग्रामसेवकांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.”

मुख्याधिकारी, नगरपंचायत एटापल्ली यांनी सांगितले की, “सदर विषय सभेपुढे मांडून मंजुरी घेतल्यानंतर संबंधित आशा व गटप्रवर्तकांना भत्ता देण्यात येईल.”

दरम्यान, पंचायत समिती एटापल्ली व नगर पंचायत एटापल्ली या दोन्ही विभागांनी भाकपा व आयटकच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करून प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्याबाबतही आवाहन केले आहे.

यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले की, “हा विजय आशा व गटप्रवर्तकांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागणे ही दुर्दैवी बाब होती. मात्र आता न्याय मिळत असल्याने समाधान आहे.”

या लढ्यात कॉ. सुरज जककुलवार यांच्यासह आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, थकीत २८ महिन्यांचा भत्ता देण्याचा निर्णय झाल्यामुळे आशा व गटप्रवर्तकांची मागणी पूर्ण झाली असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular