VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /अहेरी,०३ जुलै २०२६::- कोरोना महामारीच्या भीषण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावाचे रक्षण करणाऱ्या ग्रामपंचायत आलापल्ली येथील सफाई कामगारांवर आज अन्यायाचा डोंगर कोसळलेला आहे. तब्बल 28 महिन्यांचा हक्काचा कोरोना भत्ता अद्यापही न दिल्यामुळे संतापाची लाट उसळली असून, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) आक्रमक भूमिकेत उतरला आहे.
कोविड-19 च्या काळात या सफाई कामगारांनी निर्जंतुकीकरण, स्वच्छता व संसर्ग रोखण्यासाठी अग्रभागी राहून अहोरात्र सेवा दिली. त्यांच्या या सेवेची दखल घेत शासनाने प्रति महिना 1000 रुपये कोरोना भत्ता देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. जिल्हा परिषद गडचिरोलीच्या 08 डिसेंबर 2021 च्या पत्राद्वारेही हे निर्देश अधोरेखित करण्यात आले होते.
मात्र, शासनाचे आदेश असूनही स्थानिक प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांहून अधिक काळ उलटूनही या कामगारांना त्यांचा हक्काचा भत्ता न देणे ही केवळ निष्क्रियता नसून थेट कामगारांच्या हक्कांची पायमल्ली असल्याचा आरोप भाकपाकडून करण्यात आला आहे.
यापूर्वी ग्रामसेवक, आलापल्ली यांना निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि निष्क्रिय भूमिकेमुळे संतप्त झालेल्या सफाई कामगारांनी आणि भाकपा कार्यकर्त्यांनी आता गटविकास अधिकारी, पंचायत समिती अहेरी यांच्याकडे पुन्हा निवेदन देत आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.
यावेळी भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी प्रशासनावर घणाघाती हल्ला चढवत म्हटले की, “कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कामगारांना आजही त्यांचा हक्काचा भत्ता न देणे हे अत्यंत निंदनीय आणि अमानुष आहे. पाच-पाच वर्षे उलटूनही अधिकारी झोपेत असतील, तर ही झोप आम्ही रस्त्यावर उतरून मोडून काढू. कामगारांचा एकही रुपया गिळंकृत करू दिला जाणार नाही. तात्काळ भत्ता द्या, अन्यथा भाकपा तीव्र आंदोलन उभारून प्रशासनाला जबाब देण्यास भाग पाडेल!”
भाकपा गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, संबंधित सफाई कामगारांना त्यांचा 28 महिन्यांचा प्रलंबित कोरोना भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा. अन्यथा, या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
या लढ्यात भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार, महिला फेडरेशन अहेरी अध्यक्षा कॉ. नेहा नारलावार तसेच इतर कार्यकर्ते व आलापल्ली येथील सफाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
