VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली ,०३ जुलै २०२६::- चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली येथील विवाहित महिला कनिका ब्रजकेश दास हिच्यावर तिचा पती ब्रजकेश ठाकुर दास (रा. विकासपल्ली, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) याने केलेल्या कथित जिवघेण्या हल्ल्याच्या घटनेचा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वि. प्र. काळे तसेच अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी चांदेवार सर यांना भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगिताताई पिपरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, विवाहित महिला कनिका ब्रजकेश दास हिच्यावर तिच्याच पतीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असून, या प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल व वेगवान तपास करून आरोपी ब्रजकेश ठाकुर दास याच्याविरुद्ध भक्कम पुरावे न्यायालयात सादर करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष श्रीमती अनिताताई रॉय, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री सौ. अर्चनाताई बोरकुटे, भाजपा जेष्ठ नेत्या श्रीमती प्रतिभा चौधरी,माजी पंचायत समिती सदस्या अमिता मडावी, सुंदरा करकाडे, कविता उरकुडे, माजी सभापती पंचायत समिती चामोर्शी श्रीमती आकोलीताई तसेच भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये. पीडित महिला कनिका ब्रजकेश दास हिला तातडीने न्याय मिळावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करून कठोर शिक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
