Monday, September 14, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीतील प्राथमिक शिक्षकांच्या १५ प्रलंबित मागण्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाशी सकारात्मक चर्चा...

गडचिरोलीतील प्राथमिक शिक्षकांच्या १५ प्रलंबित मागण्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाशी सकारात्मक चर्चा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन,

गडचिरोली,१२ जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या शिष्टमंडळाने दिनांक ९ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार तसेच उपशिक्षणाधिकारी परसावार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

शिष्टमंडळाने शिक्षकांच्या सेवाविषयक, वेतन, पदोन्नती, बदली, अशैक्षणिक कामांचा वाढता ताण, प्रशिक्षण, समायोजन तसेच प्रशासकीय अडचणींबाबत एकूण १५ महत्त्वपूर्ण मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.

निवेदनामध्ये प्राथमिक शिक्षकांना एकस्तर पदोन्नतीवेळी एस-१४ वेतनश्रेणीचा लाभ, बी.एल.ओ.सह इतर अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता, पदवीधर व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचे नियमितीकरण, न्यायालयीन व ऑनलाइन बदली झालेल्या शिक्षकांना तातडीने भारमुक्त करणे, जिओ-टॅग फोटो प्रणाली बंद करणे, रिक्त विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरणे, शासकीय सुट्टीच्या काळात प्रशिक्षण न घेणे, तालुका स्तरावरील समायोजन करताना शक्यतो त्याच किंवा लगतच्या केंद्रात समायोजन करणे, थकीत वेतन देयके त्वरित अदा करणे, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेतनवाढ, “मावा नार मावा शाळा” उपक्रम स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविणे, विविध चाचणी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, काही शिक्षकांची थकीत वेतन प्रकरणे व भारमुक्ती तसेच मृत शिक्षकांच्या पाल्यांना सेवापुस्तकाची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्याच्या मागण्या करण्यात आल्या.

यावेळी संघटनेने शिक्षकांवर वाढत चाललेल्या अशैक्षणिक कामांच्या ताणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असल्याची बाबही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षकांना शैक्षणिक कार्यासाठी अधिक वेळ उपलब्ध व्हावा, यासाठी विविध प्रशासकीय प्रक्रियांमध्ये सुलभता आणण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार आणि उपशिक्षणाधिकारी परसावार यांनी संघटनेने मांडलेल्या सर्व मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित विषयांचा नियमांनुसार अभ्यास करून टप्प्याटप्प्याने योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर यांच्यासह योगेश ढोरे, चक्रपाणी कन्नाके, पुंडलिक देशमुख, बापू मुनघाटे, गौतम लांडगे, प्रदीप सेलोकर, राजेश चिल्लमवार, खिरेंद्र बांबोळे, सुरेश वासलवार, आशीष धात्रक, देवेंद्र लांजेवार, मंगेश गडेवार, धनेश कुकडे, समीर भजे, आकाश चांदेकर, लोकेश बारसागडे, संजय मडावी, अमरदीप भुरले, प्रभाकर गडपायले, अशोक जुवारे, प्रविण सहारे, साईनाथ अलोने, चंद्रकांत वेटे, अनिल मेश्राम, तेजराज नंदगिरवार, नरेंद्र कोतावार, रमेश रामटेके, जगदीश कळाम, राजेश बाळराजे, किरण उराडे, डंबेश पेंदाम, हरिष नंदनवार, मनोज रोकडे, राजकुमार कुळसंगे, राजेंद्र भुरसे, सुधाकर गायकवाड, प्रल्हाद चव्हाण, विजय मंथनवार, राकेश सोनटक्के, मंगल चरडुके, संदीप उराडे, गणेश बोईनवार यांच्यासह संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

संघटनेने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने लवकर निर्णय घेऊन सर्व मागण्यांवर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular