VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध,
गडचिरोली/अहेरी,१८ जुलै २०२६::- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्या जनआंदोलनाची दखल जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
अहेरी परिसरात निर्माण झालेल्या युरिया व इतर रासायनिक खतांच्या टंचाईमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. या गंभीर प्रश्नावर भाग्यश्री ताई आत्राम यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी “चष्मा भेट आंदोलन” छेडले होते. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत खतांचा पुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. त्यानंतर युरिया व इतर रासायनिक खते वेळेत उपलब्ध झाल्याने हजारो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला.
भाग्यश्री ताई आत्राम या केवळ खतटंचाईचा प्रश्नच नव्हे, तर शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रश्नांवर प्रशासनाला त्वरित निर्णय घ्यावे लागल्याची चर्चा परिसरात आहे.
यावेळी भाग्यश्री ताई आत्राम यांनी, “शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आमचा संघर्ष यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील. जनतेच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या नेतृत्वामुळे प्रशासनालाही जनभावनेची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी लागत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
