Saturday, September 12, 2026
HomeGadchiroli22 जुलै रोजी गडचिरोलीत 'हरित महोत्सवा'चा महासंकल्प...

22 जुलै रोजी गडचिरोलीत ‘हरित महोत्सवा’चा महासंकल्प…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

जिल्हाभर 12 हजार वृक्षांचे होणार रोपण,

गडचिरोली, १८ जुलै २०२६::- पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि हरित गडचिरोलीच्या संकल्पाला बळकटी देण्यासाठी 22 जुलै रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात भव्य ‘हरित महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व 12 तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.

अहेरी येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रत्येक तालुक्यात 1,000 वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून, जिल्हाभरात एकूण 12 हजारांहून अधिक वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

या अभियानात लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असा संदेशही या उपक्रमातून दिला जाणार आहे.

यावेळी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, “वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. पर्यावरण संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हिरवाईचा वारसा निर्माण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ वृक्ष लावणेच नव्हे, तर त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने मनापासून सहभाग घेतल्यास गडचिरोली हरित विकासाचा आदर्श जिल्हा ठरेल.”

या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळण्यासोबतच हवामान बदलाच्या दुष्परिणामांवर मात करण्यासाठी जनजागृती होणार असून, जिल्ह्यात हरित विकासाची नवी चळवळ उभी राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular