VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
ग्रामस्थांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा,
गडचिरोली/धानोरा, १८ जुलै २०२६::- धानोरा तालुक्यातील चातगाव ग्रामपंचायतीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासाशी निगडित विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
ग्रामसभेत शिक्षण, आरोग्य, घरकुल योजना, सामाजिक प्रश्न, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अवैध दारू विक्री, विद्युत खांबांवरील बंद दिवे तसेच इतर स्थानिक समस्यांवर ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला. नागरिकांनी आपल्या अडचणी आणि अपेक्षा आमदारांसमोर मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
यापूर्वी झालेल्या गाव भेटीदरम्यान दिलेल्या सूचनांनुसार करण्यात आलेल्या विकासकामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच चातगाव व शिंगणापूर येथे जिल्हा परिषद शाळेची आवश्यकता, मागील वर्षीच्या घरकुल पंचनाम्यांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे, ग्रामसभा नियमितपणे न होणे आदी महत्त्वाचे मुद्दे ग्रामस्थांनी उपस्थित केले. या सर्व विषयांवर संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाहीसाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या ग्रामसभेला चातगाव, कुडकवाही, टोला आणि कटेझरी येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, सूचना आणि विकासाबाबतच्या अपेक्षा मांडल्या. नागरिकांच्या सहभागामुळे ग्रामसभा उत्स्फूर्त वातावरणात पार पडली.
यावेळी सरपंच गोपालजी उईके, उपसरपंच भूमिकाताई धुळसे, तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, युवा नेते अविनाशजी पोरेटी, गिरीधरजी जराते, नितीनजी कोत्तावार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत विकासकामांना गती देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
