Tuesday, July 28, 2026
HomeGhotघोट परिसरातील निस्वार्थी सेवक सुनील रंगारी यांचा मानवतेचा सन्मान; नवीन वस्त्र, पादत्राणे...

घोट परिसरातील निस्वार्थी सेवक सुनील रंगारी यांचा मानवतेचा सन्मान; नवीन वस्त्र, पादत्राणे व भोजनाची व्यवस्था…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/घोट,२१ जुलै २०२६::- घोट परिसरात अनेक वर्षांपासून कोणत्याही अपेक्षेशिवाय सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणारे आणि प्रत्येकाला “जय हिंद” म्हणत सलाम करणारे सुनील केशव रंगारी यांचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या पुढाकारातून सुनील रंगारी यांना नवीन कपडे, पादत्राणे भेट देण्यात आली तसेच त्यांच्या भोजनाचीही कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली.

सुनील रंगारी हे मानसिक आजाराशी झुंज देत असले तरी घोट व परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसराची स्वच्छता निस्वार्थपणे करत असतात. कुणी मदत केली किंवा नाही, याची अपेक्षा न ठेवता ते आपले कार्य सुरूच ठेवतात. खाकी वेशभूषा परिधान करून प्रत्येकाला सलाम करत “जय हिंद” म्हणणारे सुनील हे घोट पंचक्रोशीत सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व बनले आहेत.

त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची माहिती मिळताच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी त्यांची भेट घेत नवीन वस्त्र व पादत्राणे भेट दिली. तसेच घोट येथील उपाध्ये हॉटेलमध्ये त्यांना जेवणाची व्यवस्था करून देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.

यावेळी बोलताना डॉ. प्रणय भाऊ खुणे म्हणाले, “समाजात अनेक जण निस्वार्थीपणे कार्य करतात; मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. अशा गरजू व्यक्तींना मोठ्या आर्थिक मदतीपेक्षा वेळेवर अन्न, पाणी, कपडे आणि मायेचा आधार मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या परीने अशा व्यक्तींना मदतीचा हात द्यावा.”

या कार्यक्रमाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानुभाऊ उपाध्ये, भाजप घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार, आदिवासी आघाडी अध्यक्ष विलास उईके, भोजराज रामटेके, मानवाधिकार संघटनेचे नेते महेश विश्वास, तालुका सचिव दिनेश मुजुमदार तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकीचा संदेश देत, समाजातील उपेक्षित व्यक्तींप्रती सहानुभूती व जबाबदारीची भावना जपण्याचे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular