Tuesday, July 28, 2026
HomeGadchiroliमार्कंडादेव वैनगंगा घाटाच्या सर्वांगीण विकासाला गती...

मार्कंडादेव वैनगंगा घाटाच्या सर्वांगीण विकासाला गती…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

जिल्हा नियोजन समितीचा पुरातत्त्व विभागाकडे प्रस्ताव

गडचिरोली,२१ जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या मार्कंडादेव येथील वैनगंगा नदी घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा नियोजन अधिकारी, गडचिरोली यांनी दि. २१ जुलै २०२६ रोजी नागपूर विभागाच्या सहायक संचालक (पुरातत्त्व) यांना सविस्तर प्रस्ताव पाठवून घाटाच्या विकासासाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या उपक्रमामुळे मार्कंडादेव परिसराचा धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून अधिक व्यापक विकास होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव हे “विदर्भाचे खजुराहो” म्हणून ओळखले जाणारे प्राचीन मंदिर समूह असून, वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर वसलेले हे स्थळ राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विशेषतः महाशिवरात्रीच्या यात्रेदरम्यान लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, घाटावर सुरक्षित आणि आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मार्कंडादेव घाटाच्या विकासासाठी श्रीमंत संतोष सो. छायादेवी छबिलदास नारायण सुरपाम यांनी सातत्याने पाठपुरावा करून निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हा नियोजन समितीने हा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडे पाठवून सकारात्मक कार्यवाहीची विनंती केली आहे.

प्रस्तावातील प्रमुख मागण्या :-

घाटाचा सर्वांगीण व सुरक्षित विकास करण्यासाठी प्रस्तावात पुढील सुविधांचा समावेश करण्यात आला आहे –

वैनगंगा नदीकाठावर मजबूत व सुरक्षित घाटाची उभारणी.

नदीत उतरण्यासाठी पक्क्या व सुरक्षित पायऱ्यांचे बांधकाम.

महिला भाविकांसाठी स्वतंत्र व सुरक्षित चेंजिंग रूम्स.

नदीपात्रात अपघात टाळण्यासाठी लोखंडी सुरक्षा बॅरिकेड्स.

धोक्याची पातळी दर्शविणारे सूचना फलक.

घाट परिसरात हायमास्ट दिव्यांद्वारे भक्कम प्रकाशव्यवस्था.

शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा.

स्वच्छतेसाठी कचराकुंड्या व आवश्यक स्वच्छता व्यवस्थेची उभारणी.

धार्मिक पर्यटनाला नवी दिशा :-

मार्कंडादेव मंदिर समूह हा पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखालील ऐतिहासिक वारसा असून, प्राचीन स्थापत्यकला आणि वैनगंगा नदीचे निसर्गसौंदर्य यांचा अद्वितीय संगम येथे अनुभवायला मिळतो. घाटाचा विकास झाल्यास भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध होतील. तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या धार्मिक व पर्यटन विकासाला मोठी चालना मिळून स्थानिक रोजगाराच्या संधीही वाढण्यास मदत होईल.

जिल्हा नियोजन समितीने हा प्रस्ताव सकारात्मकरीत्या विचारात घेऊन आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. तसेच संबंधित कार्यालयाचा अहवाल मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्था, मार्कंडा (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांनाही माहितीस्तव पाठविण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मार्कंडादेव हे विदर्भातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असल्याने, घाट विकासाचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळण्याबरोबरच गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर मार्कंडादेवचे स्थान अधिक भक्कम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular