VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
मुरखडा (माल) येथे ७० वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी,
गडचिरोली /चामोर्शी,२१ जुलै २०२६::- “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत चामोर्शी तालुक्यातील मुरखडा (माल) येथे दि. २० जुलै २०२६ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमात वारकरी संप्रदायातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण ७० वारकऱ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली आणि ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात वारकऱ्यांची रक्तदाब, रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी, सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी तसेच इतर आवश्यक आरोग्य चाचण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर गरजेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले आणि वारीदरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी, पुरेसे पाणी पिणे, नियमित औषधे घेणे व संतुलित आहार याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वैद्यकीय समन्वयक हर्षाली नैताम, ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथील डॉ. भैसारे व त्यांच्या वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. तसेच ह.भ.प. धनराज महाराज नागपुरे, विठ्ठल मंदिर आश्रमाचे पदाधिकारी, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोलीची टीम, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
वारी हा श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा सोहळा मानला जातो. अशा पवित्र यात्रेपूर्वी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले. वेळेवर आरोग्य तपासणी व आवश्यक औषधोपचार उपलब्ध झाल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनीही स्वागत करत अशा आरोग्य सेवा भविष्यातही सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
