VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
आमदार रामदासजी मसराम यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांना दिला दिलासा,
गडचिरोली /आरमोरी,२१ जुलै २०२६::-तालुक्यातील वैरागड परिसरात रानटी हत्तीच्या हल्ल्यामुळे परा तसेच रोवलेल्या धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार रामदासजी मसराम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत परिस्थितीची पाहणी केली.

घटनास्थळी कृषी सहाय्यक मेश्राम पंचनामा करत असताना आमदार मसराम यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे अचूक व पारदर्शक पंचनामे करण्यात यावेत आणि शासनाकडून तातडीने आर्थिक भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही त्वरीत पूर्ण करावी, असे सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार मसराम यांनी, “रानटी हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाकडून योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी आपण ठामपणे पाठपुरावा करू. संकटाच्या या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असे आश्वासन दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी काँग्रेस कमिटी आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, वनरक्षक डिकेश ढोलने, अतुल धात्रक, वनमजूर प्रकाश गेडाम, केशव कुंभरे, किशोर आकारे, संजय खंडारकर, चंद्रकांत आकारे तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

रानटी हत्तींच्या वाढत्या वावरामुळे वैरागड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याबरोबरच हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

“शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम ठाम!” हा संदेश देत आमदार रामदासजी मसराम यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.
