VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली,३० जुलै २०२६::- लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा महोत्सवा’ अंतर्गत धानोरा तालुका व गडचिरोली येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. रुग्ण व गरजू नागरिकांसाठी अन्नदान, महिला सन्मान तसेच सामाजिक सेवेद्वारे वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारतीय जनता पार्टी, तालुका धानोरा यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी गोड जेवणाचे आयोजन करण्यात आले. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

याच सेवा महोत्सवांतर्गत कर्तव्य कक्ष क्रमांक ३, धानोरा येथे उद्योजक महिला, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका तसेच महिला भजन मंडळींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या कार्याचा गौरव करून महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला.

दरम्यान, जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोली येथे “माणुसकीचा घास” या उपक्रमांतर्गत सलग १२९३ व्या दिवशी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाचे वाटप करण्यात आले. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अनिलभाऊ कुनघाडकर, रेखाताई डोळस, घनश्याम वाढई, विनोद देवोजवार, हर्षल गेडाम, सीमा कोसे कन्नमवार, शिल्पा हेमके, अंकुश हेमके, कोमल नैताम, अर्चना निंबोड, ज्ञानेश्वरी धंदरे, शेखर आखाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सेवा महोत्सवाच्या माध्यमातून अन्नदान, रुग्णसेवा आणि महिला सन्मान अशा विविध उपक्रमांद्वारे समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करण्यात आली. वाढदिवस साजरा करण्याचा हा समाजाभिमुख आणि सेवाभावी उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

