VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव,
गडचिरोली ,०१ ऑगस्ट २०२६::- महसूल प्रशासन हे शासनाच्या कार्याचा केंद्रबिंदू असून जनतेसाठी महसूल अधिकारी व कर्मचारी हे शासनाचे प्रत्यक्ष प्रतिनिधी आहेत. त्यामुळे शासनाच्या विविध योजना, सेवा आणि निर्णय नागरिकांपर्यंत वेळेत व प्रभावीपणे पोहोचवून लोकाभिमुख, पारदर्शक आणि संवेदनशील प्रशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

महसूल दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, नागरिकांचा शासनावरील विश्वास दृढ ठेवण्यासाठी महसूल विभागाने वेळेवर, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणे आवश्यक आहे. महसूल प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा उंचावण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करताना संवेदनशीलता, तत्परता आणि उत्तरदायित्व जपणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी प्रास्ताविकातून महसूल दिन साजरा करण्यामागील शासनाचा उद्देश तसेच महसूल विभागाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीची माहिती दिली. महसूल विभागाच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि लोकाभिमुख प्रशासनाची बांधिलकी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल दिनानिमित्त विविध संवर्गातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, सौ. लक्ष्मीछाया मुरलीधर मेश्राम (पोलीस पाटील, येवली), सत्यवान भोयर (महसूल सेवक, अडपल्ली साजा), रतन सहारे (महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय), हेमंत मोहरे (नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय), चेतन पाटील (तहसीलदार, मुलचेरा), संपत खराटे (उपविभागीय अधिकारी, चामोर्शी), श्याम दहीकर (वाहनचालक, जिल्हाधिकारी कार्यालय), रायल तलांडे (ग्राम महसूल अधिकारी, भामरागड), पवन पिलारे (मंडळ अधिकारी, एटापल्ली) आणि संकेत आत्राम (शिपाई, जिल्हाधिकारी कार्यालय) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनीशाम येरमे, नायब तहसीलदार (रोजगार हमी योजना), जिल्हाधिकारी कार्यालय यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.
