VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडून आमदार रामदास मसराम यांना कार्यशाळेचे निमंत्रण,
गडचिरोली,०७ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्याचा विकास केवळ आजच्या गरजांपुरता मर्यादित न ठेवता आगामी 20 वर्षांचा दूरदृष्टीपूर्ण विकास आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने ‘व्हिजन गडचिरोली 2047’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून होणाऱ्या या उपक्रमात पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या भवितव्यावर व्यापक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
16 व 17 ऑगस्ट रोजी गडचिरोलीत विचारमंथन :-
आर. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे 16 व 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, शेती, सिंचन, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि आदिवासी विकास यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि पत्रकारांच्या सहभागातून चर्चा केली जाणार आहे.
विकासाच्या प्रश्नांवर पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन :-
या उपक्रमाचा एक भाग म्हणून माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांची वडसा येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांना ‘व्हिजन गडचिरोली 2047’ कार्यशाळेचे निमंत्रण देण्यात आले.
गडचिरोलीच्या विकासासाठी केवळ राजकीय भूमिका पुरेशी नसून जिल्ह्यातील विविध घटकांचा अनुभव, सूचना आणि भविष्यातील गरजा विकास आराखड्यात प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच माध्यम प्रतिनिधींनी या विचारमंथनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘2047’च्या गडचिरोलीची दिशा ठरविण्याचा प्रयत्न :-
रोजगाराच्या नव्या संधी, स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योग, शेती व सिंचनाचा विस्तार, आदिवासी भागातील मूलभूत सुविधा, पर्यटनाला चालना आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास याबाबत ठोस सूचना व संकल्पना मांडण्याची संधी या कार्यशाळेत उपलब्ध होणार आहे.
पक्षीय राजकारणापेक्षा जिल्ह्याचा विकास हा केंद्रबिंदू ठेवून ‘व्हिजन गडचिरोली 2047’च्या माध्यमातून गडचिरोलीच्या पुढील पिढीचे भविष्य घडविण्यासाठी व्यापक संवाद सुरू करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
