Sunday, September 6, 2026
HomeGadchiroliमहाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही...

महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

 ३६ हजार कंपन्यांच्या नोंदणी रद्दीकरणावर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

गडचिरोली ,१३ ऑगस्ट २०२६::- महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचा तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचा विरोधकांचा दावा चुकीचा असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. कंपन्यांची नोंदणी रद्द होणे आणि उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणे या दोन वेगळ्या बाबी असून, चुकीची आकडेवारी मांडून उद्योग विभागाची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसभेत देण्यात आलेल्या उत्तराचा आधार घेत राज्यातील ३६,२११ कंपन्या बंद पडल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या कंपन्यांची नोंदणी विविध कारणांमुळे रद्द करण्यात आली असून, त्याचा अर्थ संबंधित उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले असा होत नाही, असे सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक आर्थिक कागदपत्रे वेळेत सादर न करणाऱ्या किंवा दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याची नियमित प्रक्रिया केली जाते. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्यांवर अशी कारवाई झाली. यामध्ये बिझनेस सर्व्हिसेस क्षेत्रातील १४,६१३, मॅन्युफॅक्चरिंगमधील ६,५८२, ट्रेडिंगमधील ४,१९६ आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील २,३५६ कंपन्यांचा समावेश आहे.

ही प्रक्रिया केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह देशभरातील कंपन्यांवर करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी रद्द झालेल्या कंपन्यांची संख्या म्हणजे महाराष्ट्रातून उद्योग बाहेर गेल्याचे प्रमाण मानणे चुकीचे असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर :-

महाराष्ट्र गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून परकीय थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा सामंत यांनी केला. दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी सुमारे ७५ ते ८० टक्के करारांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या GCC परिषदेतून राज्यात सुमारे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, त्यातून जवळपास पाच लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

चाकणमधून उद्योग बाहेर गेल्याचा दावा फेटाळला :-

चाकण औद्योगिक क्षेत्रातून ४० उद्योग बाहेर गेल्याचा दावाही उद्योगमंत्र्यांनी फेटाळून लावला. उद्योजकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी चाकणमधील उद्योजकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अडचणी समजून घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

गडचिरोलीच्या स्टील हबला चालना :-

गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित स्टील हबमुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. स्थानिक युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्टील हब आणि कौशल्य विकासाशी संबंधित कामे करताना शेतकरी, स्थानिक नागरिक आणि संबंधित घटकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. औद्योगिक विकासाचा लाभ स्थानिकांना मिळावा, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा मिळावी, या उद्देशाने शासन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular