VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी,१६ ऑगस्ट २०२६::- देशाचा स्वातंत्र्यदिन चामोर्शी शहरात देशभक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि नगरपंचायत कार्यालयासह विविध शासकीय कार्यालये तसेच शहरातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आकर्षक रॅली काढत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. हातात तिरंगा ध्वज, देशभक्तीपर घोषणा आणि भारतमातेच्या जयघोषाने चामोर्शी शहराचा परिसर दुमदुमून गेला.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

तहसील कार्यालय चामोर्शी, पंचायत समिती चामोर्शी आणि नगरपंचायत कार्यालय येथे नियोजित कार्यक्रमानुसार ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळांमध्येही विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि प्रभातफेरीचे आयोजन केले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून उपस्थितांनी देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम राखण्याचा संकल्प केला.

‘तिरंग्याचा मान, देशाचा अभिमान; एकतेतून घडवूया भारत महान!’ या भावनेने चामोर्शी शहरात स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.

