VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चात्मक संवाद; रविभवनात आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक,
महाराष्ट्र/नागपूर,२२ ऑगस्ट २०२६::- आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, प्रलंबित प्रश्न आणि शैक्षणिक सुविधांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ, नागपूर यांच्या वतीने नागपूर येथील अपर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

दि. १३ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या आंदोलनात भरपावसातही आदिवासी विद्यार्थी आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडित प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, देवरीचे आमदार संजयजी पुराम, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा जिल्हाध्यक्ष पुसद डॉ. आरती फुपाटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश इरपाची यांच्यासह विविध आदिवासी पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. डॉ. अशोकजी नेते यांनी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पोहोचवून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
दरम्यान, आंदोलनस्थळी भेटीनंतर रविभवन, नागपूर येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसोबत चर्चात्मक बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या व अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या. मंत्र्यांनीही विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेत त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी चर्चा केली.
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे हा त्यांचा अधिकार असून, त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चर्चेमुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक मार्ग निघण्याची आशा निर्माण झाली आहे.
