Saturday, September 5, 2026
HomeGadchiroli‘वॉक फॉर वॉटर’मधून गडचिरोलीत जलसंधारणाचा जागर; पाणी बचतीचा संदेश जनमानसात...

‘वॉक फॉर वॉटर’मधून गडचिरोलीत जलसंधारणाचा जागर; पाणी बचतीचा संदेश जनमानसात…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,२२ ऑगस्ट २०२६::- ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ आणि ‘पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा’ या संदेशांनी गडचिरोली शहर दुमदुमून गेले. जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित **‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’**ला नागरिक, युवक-युवती तसेच विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून जलसंधारण आणि पाणी बचतीचा प्रभावी संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला.

इंदिरा गांधी चौकातून सुरू झालेल्या वॉकेथॉनला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. जलसंधारणाचे संदेश देणारे फलक, घोषवाक्ये आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांमुळे वॉकेथॉनला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. पोटेगाव येथील जिल्हा स्टेडियममध्ये या उपक्रमाचा उत्साहात समारोप झाला.

१५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह :-

मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा प्रणिती निंबोरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश कोठेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद घाडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाणी संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा – डॉ. मिलिंद नरोटे :-

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पाण्याचे योग्य नियोजन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुषार सिंचन आणि इतर जलसंधारणाच्या उपाययोजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्हा सुजलाम्-सुफलाम् ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या कृतींतून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जलसंधारणाच्या जनजागृतीत नगराध्यक्षा प्रणोती निंबोडकर यांचा सक्रिय सहभाग :-

जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये नगराध्यक्षा प्रणोती निंबोडकर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पाणी बचत आणि जलसंधारणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला. शहराच्या विकासासोबतच पर्यावरण संवर्धन आणि भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रत्येक नागरिकाच्या कृतीत उतरली पाहिजे, असे सांगत त्यांनी जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले. नागरिक, युवक-युवती आणि विविध विभागांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांचा सकारात्मक सहभाग उल्लेखनीय ठरला.

नगराध्यक्षा प्रणिती निंबोरकर यांनीही भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आजपासूनच पाण्याचे संवर्धन आणि योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता लोकचळवळ बनली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

जलसंधारणावरील रिल्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ :-

दरम्यान, जलसंधारण विषयावरील रिल्स तयार करून पाठविण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रिल्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आले.

समारोपप्रसंगी वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या युवक-युवतींमधून लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

जलसंधारणाचा संदेश घराघरांत पोहोचवत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ने गडचिरोलीत पाणी बचतीच्या लोकचळवळीला नवी ऊर्जा दिली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular