Saturday, September 5, 2026
HomeGadchiroliमहिला सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिसांचा पुढाकार; महिला दक्षता समितीच्या बैठकीत विविध विषयांवर मंथन...

महिला सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिसांचा पुढाकार; महिला दक्षता समितीच्या बैठकीत विविध विषयांवर मंथन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,२३ ऑगस्ट २०२६::- महिला सक्षमीकरण, सुरक्षितता आणि महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने महिला दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २१ ऑगस्ट रोजी झालेल्या या बैठकीत महिला सुरक्षा, कायदेविषयक बाबी, सायबर गुन्हे, विद्यार्थिनींची सुरक्षितता तसेच अमली पदार्थमुक्त परिसर यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, कायदेविषयक माहिती आणि आवश्यक सुविधा पोहोचाव्यात, यासाठी पोलीस दलाकडून सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरणातून सक्षम कुटुंब आणि सक्षम समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या समितीमध्ये पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक (गृह), पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्त्या, प्रतिष्ठित महिला, महिला वकील, डॉक्टर आणि शिक्षिका यांचा समावेश आहे.

बैठकीत महिलांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, महिला सुरक्षेशी संबंधित प्रश्न, कायदेशीर हक्क, सामाजिक समस्या तसेच शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय छेडछाड, लैंगिक अत्याचाराविरोधातील कायदेशीर तरतुदी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क साधण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

‘ड्रग फ्री कॅम्पस’ या संकल्पनेवरही बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली. अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्यापासून युवक-युवतींचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित महिला दक्षता समितीच्या सदस्यांनीही महिला सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण सूचना व सल्ले मांडले.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सांगितले की, एखादी घटना घडल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा ती घटना घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर गडचिरोली पोलीस दलाचा भर राहणार आहे. महिलांनी अन्याय व अत्याचाराला बळी न पडता आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. महिलांना आपल्या समस्या मोकळेपणाने मांडता याव्यात आणि अडचणीच्या प्रसंगी तात्काळ मदत मिळावी, यासाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे. डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकाच्या माध्यमातून महिला, बालकांसह सर्व नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाते.

महिला सुरक्षेसाठी केवळ पोलीस दल नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहून सक्रिय सहभाग घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबन यांना प्राधान्य देत गडचिरोली पोलीस दल महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीच्या आयोजनासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे, भरोसा सेलच्या मपोउपनि. राजश्री रामटेके तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी पोलीस दलाच्या या उपक्रमाचे स्वागत करत महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular