VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान; पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत व्यक्त केली कृतज्ञता,
एकलव्य सभागृह, गडचिरोली आणि प्राणहिता उपमुख्यालयात विशेष कार्यक्रम; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहीद कुटुंबीयांच्या घरी जाऊन केली विचारपूस,
गडचिरोली, २१ ऑक्टोबर २०२६ ::- देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या शौर्याचे स्मरण करत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली, तर त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून पोलीस दलाने त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून विशेष उपक्रम :-
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृह आणि प्राणहिता उपमुख्यालय, अहेरी येथे शहीद कुटुंबीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यांत शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या सोहळ्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी आत्मीयतेने संवाद साधला. त्यांच्या भावना जाणून घेत त्यांच्या अडचणी व समस्या समजून घेतल्या. तसेच प्रत्येक कुटुंबीयाच्या त्यागाचा सन्मान करत त्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
शहीद कुटुंबीयांच्या घरी जाऊन केली विचारपूस :-

पोलीस स्मृती दिन केवळ शहीद जवानांचे स्मरण करण्यापुरता मर्यादित न ठेवता, त्यांच्या कुटुंबीयांप्रति असलेली बांधिलकी जपण्याचा उपक्रमही यानिमित्त राबविण्यात आला. पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे आणि पोलीस मदत केंद्रांच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या घरी प्रत्यक्ष भेटी दिल्या.
या भेटीदरम्यान कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत पोलीस दल त्यांच्या पाठीशी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रति आदर, संवेदनशीलता आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
‘शहीदांचे बलिदान समाजासाठी सदैव प्रेरणादायी’ — पोलीस अधीक्षक एम. रमेश :-

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश म्हणाले की, शहीदांचे स्मरण करणे, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आदर व्यक्त करणे आणि त्यांच्या त्यागाची जाणीव समाजात कायम ठेवणे, हाच पोलीस स्मृती दिनाचा खरा संदेश आहे.
कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या शौर्यामुळे आणि समर्पणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत झाली असून, जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शहीद जवानांचे बलिदान केवळ पोलीस दलासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले.
शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी गडचिरोली पोलीस दल सदैव खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि आवश्यक ते सहकार्य करणे ही पोलीस दलाची जबाबदारी आहे. शहीद जवानांच्या अतुलनीय शौर्याचा आणि सर्वोच्च बलिदानाचा वारसा जपत नागरिकांची सुरक्षा, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती :-
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. हर्षवर्धन बी. जे., प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. सुयशकुमार सिंग आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. सुनील ऊईके यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शहीद जवानांचे शौर्य, त्याग आणि देशसेवेची भावना पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान व त्यांना सहकार्य करण्याची बांधिलकी जपणे, हाच पोलीस स्मृती दिनाचा खरा गौरव आहे.
